रोहतक : दूध आणि दुग्धजन्य उत्पादन क्षेत्रात देशाने झपाट्याने प्रगती केली असून, गेल्या ११ वर्षात या क्षेत्रामध्ये ७० टक्के वाढ पाहायला मिळाली अशी माहिती केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी केली. आता हे जगातील सर्वात जास्त वेगाने वाढणारे क्षेत्र असल्याचे ते म्हणाले. हरियाणाच्या रोहतक शहरातील ‘इंडस्ट्रियल मॉडेल टाउनशिप’ येथे बांधलेल्या ‘साबरकांठा जिल्हा सहकारी दुग्ध उत्पादक संघटने’च्या प्रकल्पाचे (साबर डेअरी) उद्घाटन शहा यांच्या हस्ते करण्यात आले.
‘साबर डेअरी’चे मुख्यालय गुजरातमधील साबरकांठा येथे आहे. रोहतकमधील प्रकल्पामध्ये दररोज १५० टन दही, तीन लाख लीटर ताक आणि १० लाख लीटर योगर्टचे उत्पादन केले जाणार असून हे प्रमाण देशातील सर्वाधिक असल्याचे सांगण्यात आले.
गेल्या चार वर्षांच्या काळात सहकार विभागाने सर्व राज्य सरकारांबरोबर सहयोगाने देशातील सहकार प्रणाली अधिक मजबूत करत आहे, असे शहा यावेळी म्हणाले. देशात २०२९पर्यंत सहकार समिती नसलेली एकही पंचायत नसेल, असे आश्वासन त्यांनी दिले.
देशात २०१४-१५पर्यंत ८.६ कोटी दुभती जनावरे होती, त्यांची संख्या आता ११.२ कोटी झाली आहे. दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन १४.६ कोटी टन होते, ते वाढून २३.९ टन इतके झाले आहे. – अमित शहा, केंद्रीय सहकारमंत्री