Pahalgam Terror Attack Aftermath : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात अनेक कठोर पावले उचलली आहेत. सिंधू नदी जल करार रद्द करण्यापासून ते भारतातील पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा नाकारण्यापर्यंतचे अनेक निर्णय घेण्यात आले. आता त्याही पुढे जाऊन भारत सरकारने १६ पाकिस्तानी युट्यूब चॅनेलवर बंदी आणली आहे. यामध्ये प्रमुख वृत्तसंस्थांसहित माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरच्या चॅनेलचाही समावेश आहे. या चॅनेल्सद्वारे भारत, भारतीय लष्कर आणि सुरक्षा यंत्रणांविरोधात प्रक्षोभक माहिती पसरवल्याचा आरोप केला जात आहे. पीटीआयने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

बंदी घातलेल्या युट्यूब चॅनेलमध्ये डॉन न्यूज, समा टीव्ही, एआरवाय न्यूज, बोल न्यूज, रफ्तार, जिओ न्यूज आणि सुनो न्यूज यासारख्या प्रमुख पाकिस्तानी वृत्तवाहिन्यांचा समावेश आहे. इर्शाद भट्टी, अस्मा शिराजी, उमर चीमा आणि मुनीब फारूख यांसारख्या पत्रकारांनी चालवलेले यूट्यूब चॅनेल देखील भारतीय वापरकर्त्यांसाठी ब्लॉक करण्यात आले आहेत. इतर बंदी घातलेल्या चॅनेलमध्ये द पाकिस्तान रेफरन्स, समा स्पोर्ट्स, उजैर क्रिकेट आणि रझी नामा यांचा समावेश आहे.

भारतात पाकिस्तानी व्हिडिओ पाहू शकणार नाहीत

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, सरकारी सूत्रांनी सांगितले की, गृह मंत्रालयाच्या शिफारशींवरून ही कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई वाहिन्या चुकीची आणि खोटी माहिती, जातीय तणाव निर्माण करण्यासाठी डिझाइन केलेले कंटेंट पसरवत असल्याचे आढळून आले. बंदी घातलेले चॅनेल्स पाहताना भारतीय वापरकर्त्यांना आता YouTube कडून एक संदेश पाठवला जातो ज्यामध्ये म्हटले आहे की, “राष्ट्रीय सुरक्षा किंवा सार्वजनिक सुव्यवस्थेशी संबंधित सरकारच्या आदेशामुळे ही सामग्री सध्या या देशात उपलब्ध नाही.”

तसंच, या प्रकरणावरून भारताने बीबीसी या आंतरराष्ट्रीय माध्यम समूहालाही फटकारले आहे. पहलगाम हल्ल्याप्रकरणी त्यांच्या अहवालांवर सरकार देखरेख करणार आहे.

गर्द जंगलात दहशतवादी पसार

पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ पर्यटक मारले गेले. २२ एप्रिल रोजी हा हल्ला झाला असून तेव्हापासून सुरक्षा यंत्रणांनी या दहशतवाद्यांचा छडा लावण्यासाठी मोहीम उघडली आहे. काश्मीरच्या खोऱ्यात अनेक पथकं या दहशतवाद्यांचा छडा लावण्यासाठी कित्येक किलोमीटर पालथ घालत आहेत. अत्याधुनिक यंत्रणेचा वापरही तपास यंत्रणांकडून केला जात आहे. हल्ला झाल्यापासून पाच दिवसांत चार वेळा या दहशतवाद्यांचा ठावठिकाणा तपास यंत्रणांना लागला खरा, पण गर्द जंगलाचा आश्रय घेत त्यांनी पळ काढला.