scorecardresearch

“मी भारताला सलाम करतो, त्यांनी नेहमीच…”; पाकमधील जाहीर सभेतील भाषणात इम्रान खान यांचं वक्तव्य

मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचे कडवे टीकाकार अशी इम्रान खान यांची ओळख आहे.

Indian Pakistan Imran Khan
इम्रान खान यांनी जाहीर सभेत केलं वक्तव्य (फाइल फोटो)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचे कडवे टीकाकार असणाऱ्या पाकिस्तानी पंतप्रधानांनी मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणाचं कौतुक केलं आहे. युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या तेल संकटावर भारताने तोडगा काढण्यासाठी घेतलेल्या निर्णयावरुन पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताचं कौतुक केलंय. अमेरिकेच्या निर्बंधांची तमा न बाळगता भारताने रशियाकडून कच्चे तेल आयात केल्याचे सांगत भारत ‘स्वतंत्र परराष्ट्र धोरणाचे’ पालन करत असल्याबद्दल रविवारी इम्रान खान यांनी भारताची प्रशंसा केली. यावेळी त्यांनी थेट भारताच्या या भूमिकेला मी सलाम करतो असंही म्हटलंय.

आपला शेजारी देश असलेल्या भारताचे ‘स्वतंत्र परेराष्ट्र धोरण’ असल्याबद्दल आपण त्याची प्रशंसा करू इच्छितो, असे खैबर- पख्तुन्ख्वा प्रांतात एका जाहीर सभेत केलेल्या भाषणात खान यांनी आपल्या समर्थकांना उद्देशून सांगितले. “मैं आज हिंदुस्तान को दाद देता हूं (मी आज भारताला सलाम करतो)”, असं म्हणत त्यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणावर स्तुतीसुमनं उधळली आहेत. भारताने कायमच आपलं स्वतंत्र परराष्ट्र धोरण जपलं आहे, असं इम्रान यांनी स्पष्टपणे सांगितलं. “मी भारताला सलाम करतो, त्यांनी नेहमीच स्वतंत्र परराष्ट्र धोरण राखले. भारताचे परराष्ट्र धोरण पाकिस्तानपेक्षा चांगले आहे,” असंही त्यांनी या भाषणामध्ये म्हटलं.

‘क्वाड’चा भाग असलेल्या भारताने अमेरिकेच्या निर्बंधांनंतरही रशियाकडून तेलाची आयात केली, असे ते म्हणाले. आपले परराष्ट्र धोरण पाकिस्तानच्या लोकांना धार्जिणे असल्याचेही पंतप्रधान खान यांनी नमूद केले. ‘मी कुणासमोर झुकलेलो नाही आणि माझ्या देशालाही झुकू देणार नाही’, असे येत्या आठवड्यात संसदेत विश्वासदर्शक ठरावापूर्वी जनमताचा पाठिंबा मिळवू पाहणाऱ्या खान यांनी सांगितले.

काही आठवड्यांपूर्वीच इम्रान खान यांनी भारतामधील माहिती तंत्रज्ञान म्हणजेच आयटी उद्योगामधील यशाबद्दल भाष्य करताना भारताचं कौतुक केलं होतं. भारतामधील धोरणं ही जास्तीत जास्त गुंतवणुकदरांना आकर्षित करणारी असल्याचं इम्रान यांनी म्हटलं होतं.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Indias foreign policy better than pakistan says imran khan scsg

ताज्या बातम्या