पाकिस्ताने जगभरातील आपले राजदूतावास आणि उच्चायुक्तालयांमध्ये दोन महिन्यांपूर्वी सुरू केलेले ‘काश्मीर कक्ष’ (काश्मीर सेल्स) हे भारत व पाकिस्तान य्ऋांच्यातील विसंवादाचे ताजे कारण ठरले आहे.

पाकिस्तानची भारतविरोधी प्रचारमोहिम सुरू ठेवणे हा महत्त्वाचा उद्देश असलेल्या या ‘काश्मीर कक्षांविरुद्ध’ कारवाई करावी, अशी मागणी करण्यासाठी भारत आता भागीदार देशांशी संपर्क साधत आहे. पाकिस्तानच्या ‘खोटय़ा प्रचाराचा’ मुद्दा उपस्थित करावा असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने जगभरातील देशांच्या राजधानीतील भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांना सांगितले आहे.

लंडनमध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर भारतविरोधी निदर्शनांचे नियोजन केले जात आहे. या पार्श्वभूमीवर, स्थानिक नागरिकांना भारताविरुद्ध भडकावण्याच्या पाकिस्तानच्या मोहिमेविरुद्ध कारवाई करावी, असे भारताने अलीकडेच ब्रिटनला सांगितले आहे. सप्टेंबरमध्ये लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयाच्या बाहेर झालेल्या निदर्शनांना हिंसक वळणलागले होते.

‘पाकिस्तान सरकारने जगभरातील त्यांच्या सर्व उच्चायुक्त कार्यालयांमध्ये काश्मीर कक्ष सुरू केले आहेत. स्थानिक नागरिकांना ते जेथे असतील तेथे भडकावणे आणि खोटय़ा प्रचाराच्या माधयमातून त्यांचे कट्टरीकरण करणे हा या विभागांचा मुख्य हेतू आहे, असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी या आठवडय़ाच्या सुरुवातीला सांगितले होते. हे कक्ष हिंसाचाराला उघड प्रोत्साहन देत असल्यामुळे ते बंद केले जायला हवेत. सर्व देशांनी त्यांच्या भूमीत कार्यरत असलेल्या या कक्षांविरुद्ध योग्य ती कारवाई करावी, असे आवाहन कुमार यांनी केले.