Indigo Flight : कोलकाता ते श्रीनगर जाणाऱ्या इंडिगो एअरलाईन्सच्या विमान क्रमांक 6E-6961 चं वाराणसी विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. हवेत असताना विमानात इंधनाची गळती झाल्याचं समजताच क्रू मेंबर्सनी त्वरित परिस्थितीचं गांभीर्य ओळखून एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) शी संपर्क साधला. ज्यानंतर विमान वाराणसीला उतरवण्यात आलं. या विमानात एकूण १६६ प्रवासी आणि कर्मचारी होते. सुदैवाने सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्स सुखरूप असून, त्यांना विमानातून उतरवून विमानतळावरील आगमन विभागात नेण्यात आलं. ANI ने हे वृत्त दिलं आहे.
विमानतळ प्राधिकरणाकडून चौकशी सुरू
विमानात झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे ही घटना घडली असून, वाराणसी विमानतळ प्रशासन आणि स्थानिक पोलीसांकडून या घटनेची सखोल चौकशी सुरू आहे. विमानाच्या इंधन प्रणालीत नेमक्या कोणत्या तांत्रिक अडचणी आल्या, याचा शोध घेतला जातो आहे. पोलिसांनी स्पष्ट केलं आहे की परिस्थिती नियंत्रणात आहे आणि विमानतळावरील नियमित कामकाज पुन्हा सुरू करण्यात आलं आहे.
प्रवाशांसाठी पर्यायी विमानाची व्यवस्था करण्यात आली
इंडिगो एअरलाईन्सकडून जाहीर करण्यात आलं आहे की, प्रवाशांना श्रीनगरला पोहोचवण्यासाठी दुसऱ्या विमानाची व्यवस्था केली जात आहे. सध्या सर्व प्रवासी सुरक्षित असून, त्यांना वेटिंग रुममध्ये ठेवण्यात आलं आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित विमान अद्याप ग्राउंडवर असून, तांत्रिक पथक त्याच्या इंधन गळतीचा तपास करत आहे. प्रवाशांना पुढील फ्लाइटमध्ये पाठवण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे. अशा घटना जरी अपवादात्मक असल्या, तरी विमान वाहतुकीतील सुरक्षा आणि दक्षता किती महत्त्वाची आहे, हे पुन्हा अधोरेखित होते. इंडिगोच्या क्रू मेंबर्सनी वेळेवर योग्य निर्णय घेऊन १६६ जीव वाचवले.
