ऑस्ट्रेलियन संशोधकांनी भारताच्या एम.एस.स्वामीनाथन रीसर्च फाउंडेशनशी भागीदारी केली असून त्यात क्षारता सहन करू शकणाऱ्या भाताच्या प्रजातीची निर्मिती केली जाणार आहे. टास्मानिया विद्यापीठ व स्वामीनाथन फाउंडेशन यांच्यात गेल्या आठवडय़ात चेन्नई येथे २० लाख अमेरिकी डॉलर्सचा करार झाला असून त्याला ऑस्ट्रेलिया-भारत धोरणात्मक संशोधन निधीचे पाठबळ आहे. यात क्षारपड जमिनीत टिकाव धरू शकणाऱ्या भाताच्या प्रजातीची निर्मिती केली जाईल. भात हे आशियात अनेकांचे अन्न असून एकूण ९२ टक्के उत्पादनही आशियात होते, असे विद्यापीठाच्या अन्न संशोधन विभागाचे प्रमुख होल्गर मेन्क यांनी सांगितले. या भागातील भाताच्या उत्पादनावर क्षारयुक्त पाण्याचे प्रमाण शेतांमध्ये वाढल्याने परिणाम झाला आहे. जमिनी अनुत्पादित होत असून अनेक शेतक ऱ्यांची रोजीरोटी धोक्यात आली आहे. टास्मानिया विद्यापीठाने म्हटले आहे, की टास्मानियन कृषी संस्था जंगली भाताच्या प्रजातीची लागवड क्षारपड जमिनीत करीत आहे. जंगली भातातील जनुकांचा वापर नेहमीच्या भाताच्या प्रजातीत केला, तर त्या क्षारपड जमिनीतही वाढू शकतील व जगातील कुठल्याही क्षारयुक्त परिसरात त्यांची वाढ करता येईल. ते म्हणाले, की हा प्रकल्प तीन महिन्यांचा असून सर्जेई शाबाला यांनी दिलेल्या माहितीनुसार हा प्रकल्प अन्न सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. ऑस्ट्रेलियाचा क्रमांक भात म्हणजे तांदळाच्या निर्यातीत तिसरा लागतो. कृषी उत्पादनांच्या एकूण निर्यातीत त्या देशाचा नववा क्रमांक आहे. मूल्यवर्धित निर्यातीतून ५०० दशलक्ष डॉलर्स तर वार्षिक ८०० दशलक्ष डॉलर्सचा महसूल त्यातून निर्माण होतो. क्षारपड जमिनीत उत्पादन देणाऱ्या भाताच्या प्रजातीमुळे भारत व ऑस्ट्रेलिया या दोन्ही देशातील शेतक ऱ्यांना फायदा होणार आहे. टास्मानिया विद्यापीठ वेस्टर्न सिडनी विद्यापीठाचे झोंगहुआ चेन यांचेही सहकार्य घेत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indo australian cooperation for rice new species
First published on: 13-09-2016 at 02:00 IST