Indore Couple : इंदूरहून शिलाँगला मधुचंद्रासाठी गेलेल्या आणि बेपत्ता झालेल्या राजा रघुवंशीचा मृतदेह सापडला. त्याची पत्नी सोनम रघुवंशी अद्याप बेपत्ता आहे. दरम्यान या दोघांबाबत एका गाईडने महत्त्वाची माहिती दिली. राजा रघुवंशी आणि सोनम यांच्याबरोबर तीन जण दिसत होते अशी माहिती या गाईडने दिली आहे. या गाईडने पोलिसांना याबाबतची माहिती दिली आहे. २३ मे पासून राजा आणि सोनम दोघंही बेपत्ता झाले होते. त्यापैकी राजाचा मृतदेह २ जूनला सापडला. मात्र त्याची पत्नी अजूनही बेपत्ता आहे. दरम्यान ही नवी माहिती आता समोर आली आहे.

गाईडने काय सांगितलं?

अल्बर्ट नावाच्या गाईडने पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितलं की सोनम आणि राजा यांच्या बरोबर तीन जण होते. हे तिघेही त्यांच्यासह प्रवास करत होते. कारण हा प्रवास तीन हजार पायऱ्यांचा होता. हे तीन प्रवासी कोण होते याची माहिती आता पोलीस घेत आहेत. आदल्या दिवशी या जोडप्याने माझ्याशी चर्चा केली होती. तसंच हे दोघंही खूप चांगले होते. त्यांनी गाईड म्हणून गायब होण्याच्या एक दिवस आधी मला बरोबर घेतलं होतं. त्यामुळे हे दोघंही लक्षात राहिले असं या गाईडने सांगितलं.

Sonam and Raja Raghuvanshi
राजा रघुवंशीचा मृतदेह सापडला, सोनमचं अपहरण झाल्याची भीती कुटुंबीयांकडून व्यक्त (फोटो-ANI)

अल्बर्टने आणखी काय सांगितलं?

अल्बर्टने दिलेल्या माहितीनुसार राजा आणि इतर तिघेजण असे चारजण पुढे चालत होते. तर राजाची पत्नी सोनम त्यांच्या मागे होती. चारही जण हिंदीत बोलत होते. पण ते नेमकं काय बोलत होते ते मला कळलं नाही. कारण मला खाँसी भाषा किंवा इंग्रजी भाषा अशा दोनच भाषा येतात असंही त्याने पोलिसांना सांगितलं. या घटनेबाबत अल्बर्टने पोलिसांनी जबाब दिला आहे.

सोनम रघुवंशीच्या भावाने काय म्हटलंय?

राजाचा मृतदेह २ जून रोजी खोल दरीत सापडला. मात्र सोनम अद्यापही बेपत्ता आहे. यानंतर सोनमच्या भावाने म्हटलं आहे की, सोनम रघुवंशीचं अपहरण करण्यात आलं असावं. बचाव पथकाने हर तऱ्हेने सोनमचा शोध घेतला आहे. मात्र ती सापडलेली नाही. माझी बहीण जिवंत असणार आणि तिचं अपहरण झालेलं असावं अशी भीती मलाच नाही आम्हाला सगळ्यांना वाटते आहे असं सोनमच्या भावाने म्हटलं आहे. या प्रकरणी सीबीआयकडून चौकशी केली जावी अशी मागणीही सोनमच्या भावाने त्याच्या कुटुंबातर्फे केली आहे. माझी बहीण २३ मे पासून बेपत्ता आहे आणि तिच्याबाबत काहीही माहिती मिळालेली नाही. सोनमची बॅग आणि तिचा फोनही सापडलेला नाही. आम्ही पोलिसांना ही विनंती करतो आहोत की त्यांनी त्यांच्या तपासाचा वेग वाढवावा आणि योग्य दिशेने तपास करुन सोनमला तरी जिवंत आमच्याकडे सोपवावं. तिचं अपहरण झालेलं असावं असं आम्हाला वाटतं आहे असं सोनमच्या भावाने माध्यमांना सांगितलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेमकी ही घटना काय?

मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये राहणाऱ्या राजा रघुवंशीचं लग्न सोनमशी झालं होतं. ११ मे रोजी हा विवाह सोहळा पार पडला. त्यानंतर २० मे रोजी राजा आणि सोनम दोघंही मधुचंद्रासाठी रवाना झाले. त्यांच्या कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार राजा आणि सोनम हे दोघंही सुरुवातीला बंगळुरुला गेले. त्यानंतर बंगळुरुमार्गे हे दोघंही गुवाहाटीला गेले. गुवाहाटी येथील कामाख्या मंदिरात जाऊन त्यांनी दर्शन घेतलं. २० ते २२ मे या कालावधीत राजा आणि सोनम दोघंही त्यांच्या कुटुंबांच्या संपर्कात होते. २३ मे रोजी आम्ही शिलाँगला जात आहोत तिथून फोन करतो असं या दोघांनीही कुटुंबाला सांगितलं होतं. मात्र शिलाँगला ते दोघंही गेल्यापासून त्यांचा संपर्क तुटला. या दोघांच्या मोबाइलचं शेवटचं लोकेशन हे शिलाँग या ठिकाणी दाखवतं होतं. या दोघांनीही शिलाँगमध्ये फिरण्यासाठी भाडे तत्त्वावर फिरण्यासाठी मिळणारी अॅक्टिव्हा घेतली होती अशीही माहिती समोर आली. यानंतर या दोघांचाही शोध सुरु होता. पोलिसांना २ जून रोजी राजा रघुवंशीचा मृतदेह सापडला. मात्र त्याची पत्नी सोनम ही अद्यापही बेपत्ता आहे. तिच्याबाबत कुठलीही माहिती मिळालेली नाही. त्यामुळे तिचं अपहरण झालं असावं असा संशय तिच्या कुटुंबाला आहे.