सोशल मीडियावर एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होतो आहे. या व्हिडीओत बँकेचा एक सुरक्षा रक्षक गोळ्या झाडताना दिसतो आहे. ज्यानंतर एकच गोंधळ उडाल्याचंही दिसतं आहे. या गोळीबारात दोघांचा मृत्यू झाला. तर सहा जण जखमी झाले. गोळी चालवणाऱ्या सुरक्षा रक्षकाचा व्हिडीओ कुणीतरी मोबाईलवर चित्रित केला आणि व्हायरल केला.
व्हायरल व्हिडीओत काय?
व्हायरल व्हिडीओतल्या बँकेच्या सुरक्षा रक्षकाचं नाव राजपाल सिंह राजवत आहे असं समजतं आहे. इंदूर येथील खजराना भागातल्या कृष्ण बाग कॉलनी ११७ बी मध्ये दोन कुत्रे फिरवण्यावरुन वाद-विवाद झाला. त्यानंतर चिडलेल्या राजपाल राजवतने घरातल्या गॅलरीतून आपल्या बंदुकीतून गोळीबार केला. या गोळ्या लागल्याने विमला आचला आणि राहुल आमचा या दोघांचा मृत्यू झाला. तर एकूण सहाजण या गोळीबारात जखमी झाले. या घटनेनंतर पोलीस तिथे पोहचले आणि त्यांनी राजपाल सिंहला अटक केली. मध्य प्रदेशातल्या इंदूरमधला हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पोलिसांनी या सुरक्षा रक्षकाकडे असलेली १२ बोअरची बंदुक जप्त केली आहे.
गोळीबारात सहाजण जखमी
या प्रकरणी पोलीस अधिकारी उमराव सिंह यांनी सांगितलं की रिंग रोडजवळच्या कृष्ण बाग कॉलनीतल्या दोन कुटुंबामध्ये कुत्रे फिरवण्याच्या वादातून बाचाबाची झाली. त्यानंतर या गार्डने गॅलरीतून गोळीबार केला. ज्या घटनेत दोघांचा मृत्यू झाला तर इतर सहा लोक जखमी झाले. एनडीटीव्हीने या विषयीचं वृत्त दिलं आहे.
राजपाल सिंह राजवतचा गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत हे दिसतं आहे की या सुरक्षा रक्षकाने आपल्या बंदुकीतून गोळ्या झाडल्या. आता या राजपाल सिंहला अटक करण्यात आली असून पोलीस पुढील कारवाई करत आहेत.