प्रसूतीवेळी योग्य उपचार न दिल्यामुळे गर्भावर त्याचा परिणाम होऊन बाळाला सेलेब्रल पाल्सी झाल्यामुळे राष्ट्रीय ग्राहक तंटे निवारण आयोगाने दिल्लीतील इंद्रप्रस्थ अपोलो रुग्णालयाला आणि तेथील एका स्त्रीरोगतज्ज्ञाला एक कोटी रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. सर्वसाधारण रुग्णालयांपेक्षा स्पेशालिटी रुग्णालयांनी आणि तेथील तज्ज्ञ डॉक्टरांनी अधिक चांगली सेवा रुग्णांना दिली पाहिजे, अशी अपेक्षा आयोगाने आपल्या आदेशात व्यक्त केली.
१९९९ मध्ये घडलेल्या या घटनेच्या संदर्भात नुकताच निकाल देण्यात आला. एका दाम्पत्याला बऱ्याच वर्षांच्या प्रयत्नानंतर गर्भधारणा झाली. प्रसूतीसाठी गर्भवती महिलेला अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले. आयोगाने दिलेल्या निकालामध्ये म्हटले आहे की, रुग्णालयाकडून संबंधित महिलेची प्रसूतीदरम्यान लागणाऱ्या शस्त्रक्रियेसाठी विलंब लावण्यात आला आणि त्याचवेळी तिला अधिक तीव्रतेची औषधे देण्यात आली. महिलेच्या पोटातील अर्भकावर याचा विपरीत परिणाम होऊन पुढे त्याचे सेलेब्रल पाल्सीमध्ये रूपांतर झाले. निशथा नावाच्या या मुलीचा वयाच्या १२ व्या वर्षी त्यामुळे मृत्यू झाला. निशथाचे ९५ टक्के अवयव काम करीत नव्हते.
या प्रकरणी संबंधित पालकांनी २००२ मध्येच राष्ट्रीय ग्राहक तंटे निवारण आयोगाकडे तक्रार केली होती. रुग्णालयाने केलेल्या दुर्लक्षाकडे त्यांनी तक्रारीत लक्ष वेधले होते. याच तक्रारीवर निकाल देताना आयोगाने रुग्णालयाला ८० लाख रुपये आणि स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सोहिनी वर्मा यांना २० लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.
स्पेशालिटी किंवा सुपर स्पेशालिटी रुग्णालयांमधील उपचार खर्च इतर रुग्णालयांपेक्षा जास्त असतो. त्यामुळे अशा रुग्णालयांकडून रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांची अपेक्षाही जास्त असते, असेही मत आयोगाने नोंदविले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 27th Apr 2015 रोजी प्रकाशित
प्रसूतीवेळीच्या निष्काळजीमुळे रुग्णालयाला एक कोटीच्या नुकसानभरपाईचे आदेश
प्रसूतीवेळी योग्य उपचार न दिल्यामुळे गर्भावर त्याचा परिणाम होऊन बाळाला सेलेब्रल पाल्सी झाल्यामुळे राष्ट्रीय ग्राहक तंटे निवारण आयोगाने दिल्लीतील ..
First published on: 27-04-2015 at 03:02 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indraprastha apollo hospital doctor told to pay rs 1 crore to couple