चेहरा सुंदर व शरीर सुडौल दिसावं म्हणून कॉस्मेटिक सर्जरी करणाऱ्या इन्फ्लुअन्सरचा सर्जरीनंतर अवघ्या काही तासांत मृत्यू झाल्याची घटना तुर्कियेमध्ये घडली. विशेष म्हणजे आदल्या रात्री इन्फ्लुअन्सरनं आणि तिच्या पतीनं सर्जरी करणाऱ्या डॉक्टरबरोबर पार्टी केली होती. या पार्टीत तिघांनी मद्य घेतलं. पार्टीनंतर दुसऱ्याच दिवशी इन्फ्लुअन्सरवर डॉक्टरच्या आग्रहास्तव सर्जरी करण्यात आली. या सर्जरीनंतर काही तासांतच इन्फ्लुअन्सरचा मृत्यू झाला. अ‍ॅना बारबरा बहर बल्द्रिनी असं मृत्यू झालेल्या इन्फ्लुअन्सरचं नाव आहे.

अ‍ॅना आणि तिचा पती एल्गर माईल्स हे मोझाम्बिकहून इस्तांबूलमध्ये शुक्रवारी आले होते. त्यानंतर शनिवारी त्यांनी डॉक्टरची भेट घेतली. त्याच रात्री अ‍ॅना व एल्गरने डॉक्टरबरोबर पार्टी केली होती. या पार्टीनंतर दुसऱ्या दिवशी रविवारी अ‍ॅना व माईल्स डॉक्टरच्या क्लिनिकला भेट देण्यासाठी गेले. त्यावेळी डॉक्टरने पुढील तारखा व्यस्त असल्याने आजच अ‍ॅनावर कॉस्मेटिक सर्जरी करावी लागेल असा आग्रह धरला. सर्जरीदरम्यान अ‍ॅनाला काहीही होणार नाही, सगळं काही ठीक होईल, अशी ग्वाही डॉक्टरनं माईल्सला दिली. परंतु अ‍ॅना सर्जरीसाठी तयार नव्हती. डॉक्टराच्या आग्रहामुळे तिला सर्जरी करावी लागल्याचं माईल्सनं म्हटलं आहे. दरम्यान, अ‍ॅनावर प्लास्टिक सर्जरी पुढील आठवड्यात बुधवारी करायचं ठरलं होतं.

अ‍ॅनावर टुसा हॉस्पिटलमध्ये नाक, स्तन व पोटावरील चरबी कमी करण्याची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. रविवारी रात्री अकरा वाजता तिला ऑपरेशन थिएटरमधून बाहेर आणण्यात आलं. माईल्स म्हणाला, शस्त्रक्रिया झाल्यानंतर मी १ तास १५ मिनिटं प्रतिक्षा करत होतो. त्यानंतर मला रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तिच्या रुममध्ये जायला सांगितलं. मी खाली गेलो तेव्हा एकानं तिच्या हृदयाचे ठोके मंदावल्याचं सांगितलं. तर दुसऱ्यानं तिचा आधीच मृत्यू झाल्याचं सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अ‍ॅनाच्या मृत्यूनंतर टुसा हॉस्पिटलनं निवेदन जारी केलं आहे. त्यात अ‍ॅनावर शस्त्रक्रिया सुरू असताना अनपेक्षित अडचणी आल्या. त्यानंतर हृदयविकाराच्या झटक्याने तिचा मृत्यू झाल्याचं नमुद करण्यात आलं आहे. अ‍ॅनाचा पती एल्गर माईल्सने ब्राझिलियन वृत्तसंस्था O Tempo ला सांगितलं की, सुंदर व देखणं दिसण्यासाठी कॉस्मेटिक सर्जरी करणं अ‍ॅनाचं स्वप्न होतं, रुग्णालयात तिच्यावर मोफत सर्जरी करण्यात येणार होती. त्याबदल्यात ती रुग्णालयाचं प्रमोशन करणार होती.