हिमाचल प्रदेश, आंध्र प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्ये रुग्णसंख्येत वाढ

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी हिमाचल प्रदेश, आंध्र प्रदेश आणि जम्मू- काश्मीरला वाढत्या करोना रुग्णांचा आणि साप्ताहिक रुग्णवाढीच्या दराचा आढावा घेण्याची सूचना  केली आहे. तसेच करोना चाचण्यांची संख्याही वाढविण्यास सांगितले आहे.

तिन्ही राज्यांच्या आरोग्य सचिवांना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव आरती आहुजा यांना लिहिलेल्या पत्रात २६ ऑक्टोबरपासूनच्या आठवड्यात साप्ताहिक रुग्णसंख्या दरात वाढ झाल्याबद्दल चिंता व्यक्त केली. आहुजा यांनी उत्सवांदरम्यान करोना प्रतिबंधक उपाययोजनांची कठोर अंमलबजावणी करण्याची सूचना केली आहे. 

यापूर्वी ३० ऑक्टोबर रोजी आहुजा यांनी पश्चिम बंगाल आणि आसामला पत्र लिहून राज्यांमध्ये करोना रुग्णसंख्या वाढल्याबद्दल चिंता व्यक्त केली होती.

त्यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, जेथे मूलभूत सार्वजनिक आरोग्य धोरण (चाचणी, ट्रॅकिंग, उपचार, कोविड योग्य वर्तन आणि लसीकरण) कठोरपणे पाळले जात नाही तेथे करोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे असे निदर्शनास आले आहे. प्रतिबंधित क्षेत्राची योग्य अंमलबजावणी, या क्षेत्रामधील सक्रिय प्रकरणांसाठी घरोघरी रुग्ण शोधण्यावर अधिक लक्ष केंद्रित करणे, घरीच विलगीकरणा अंतर्गत असलेल्या रुग्णांवर कठोर आणि दैनंदिन देखरेख करणे आणि त्यांना रुग्णालयात पाठवणे यावर भर द्यावा अशी सूचनाही त्यांनी केली आहे.