अफगाणिस्तानातील बंडखोरांची रणनीती; जगाशी आर्थिक-राजनैतिक संबंधांची इच्छा

तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवल्यानंतर आता तेथे सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेसह सर्व देशांशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित करण्याची इच्छा तालिबानचे राजकीय प्रमुख मुल्ला अब्दुल गनी बरादर यांनी शनिवारी व्यक्त केली.

अफगाणिस्तान इस्लामिक अमिरातीला अमेरिकेबरोबरच अन्य सर्व देशांशी आर्थिक, व्यापारी आणि राजनैतिक संबंध हवे आहेत, असे बरादर यांनी ट्वीट संदेशाद्वारे स्पष्ट केले आहे.

अमेरिकेशी राजनैतिक आणि व्यापारी संबंध ठेवण्यास तालिबान तयार नसल्याचे वृत्त ‘क्षिनुआ’ या वृत्तसंस्थेने दिले होते. ते बरादर यांनी फेटाळले. ते म्हणाले, ‘‘आम्ही कोणत्याही देशाशी व्यापारी संबंध तोडण्याचे वक्तव्य कधीही केलेले नाही. त्यामुळे अशा प्रकारचे वृत्त ही एक अफवा आणि अपप्रचार आहे.’’

अफगाणिस्तानात तालिबानचे सरकार स्थापन करण्याच्या उद्देशाने अफगाण नेत्यांशी सल्लामसलत करण्यासाठी बरादर मंगळवारी कंदाहारहून काबूलमध्ये आले आहेत.   दरम्यान, तालिबानला सर्वसमावेशक त्याचबरोबर अंतर्गत किंवा बाह्य शत्रू नसलेले सरकार स्थापन करायचे आहे, असे तालिबानचा प्रवक्ता झबिहुल्ला मुजाहिद याने मंगळवारी स्पष्ट केले होते.

अमेरिकेशी २०२० मध्ये शांतता वाटाघाटी केलेले तालिबानचे राजकीय नेते मुल्ला अब्दुल गनी बरादर सत्तास्थापनेच्या चर्चेसाठी काबूलमध्ये दाखल झाले आहेत. ‘‘बरादर यांचे येथे येणे महत्त्वाचे होते, कारण त्यांनी तत्कालीन अफगाण  नेत्यांशी झालेल्या चर्चेत भाग घेतला होता. अफगाणिस्तानचे माजी नेते हमीद करझई यांच्याशीही त्यांनी चर्चा केली होती,’’ असे तालिबानी अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, ३१ ऑगस्टपर्यंत सरकार स्थापनेची घोषणा तालिबान करणार नाही, असे सांगण्यात आले. बडतर्फ अफगाण अधिकारी अब्दुल्ला अब्दुल्ला यांनी म्हटले आहे की, मी आणि करझई यांनी काबूलमधील तालिबानी गव्हर्नर यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी नागरिकांच्या माघारीसाठी परवानगी दिली आहे.

काबूलमध्ये अशांतता 

अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये युद्धजन्य परिस्थिती असून तेथून बाहेर पडण्यासाठी हजारो नागरिक धडपडत आहेत. भीतीग्रस्त अफगाण नागरिकही अमेरिकेत जाण्यासाठी इच्छुक आहेत. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन नागरिकांना तेथून हलवण्याचे आश्वासन पाळतात का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ३१ ऑगस्टपर्यंत अमेरिकी सैनिकांना परत आणले जाईल, असे स्पष्ट करीत बायडेन यांनी शुक्रवारी रात्री सैन्यमाघारीच्या मुदतवाढीस नकार दिला. काबूल विमानतळावरील गर्दी आणि गोंधळ, विमानांच्या पंख्यांना लटकल्याने झालेले मृत्यू याबाबतच्या चित्रफिती समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर बायडेन यांच्यावर टीका सुरू झाली आहे. त्या अनुषंगाने सैन्यमाघारीच्या निर्णयाचे समर्थन करताना बायडेन म्हणाले, की लोकांना तेथून सुरक्षित ठिकाणी हलवण्यात अमेरिकेने महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. जास्तीत जास्त लोकांना ३१ ऑगस्टआधी माघारी आणण्याचे अमेरिकेचे प्रयत्न आहेत.

बहारिनने आपल्या हवाई क्षेत्रातून विमान वाहतुकीस परवानगी दिल्यामुळे अमेरिकेवरील दडपण कमी होणार आहे. संयुक्त अरब अमिरातीही पाच हजार अफगाण नागरिकांना हलवण्याची व्यवस्था करणार आहेत. शुक्रवारी ५७०० लोकांना अफगाणिस्तानबाहेर नेण्यात आले, त्यात २५० अमेरिकी नागरिकांचा समावेश होता. १६ सी १७ विमाने त्यासाठी तैनात करण्यात आली होती. त्यांना सहा हजार अमेरिकी सैनिकांचे संरक्षण होते. दरम्यान, तालिबानची पश्तो, उर्दू, अरेबिक, इंग्लिश, दारी या भाषांतील अधिकृत संकेतस्थळे आता ऑफलाइन झाली आहेत.

तालिबानशी जमवून घेण्याची ब्रिटनची तयारी

लंडन : अफगाणिस्तानातील पेचावर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू असून आवश्यकता भासल्यास तालिबानबरोबर काम करण्याचा पर्याय ब्रिटनने खुला ठेवला आहे, असे त्या देशाचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी शनिवारी स्पष्ट केले.

सरकार स्थापनेचे प्रयत्न 

अमेरिकेशी गेल्या वर्षी शांतता वाटाघाटी केलेले तालिबानचे राजकीय नेते मुल्ला अब्दुल गनी बरादर सत्तास्थापनेच्या चर्चेसाठी काबूलमध्ये दाखल झाले आहे. ‘‘बरादर यांचे येणे महत्त्वाचे आहे, कारण त्यांनी तत्कालीन अफगाण नेत्यांशी झालेल्या चर्चेत भाग घेतला होता,’’ असे तालिबानी अधिकाऱ्यांनी सांगितले.

 

काबूल सोडण्याची धडपड…

काबूलमध्ये युद्धजन्य परिस्थिती आहे. नाक्यानाक्यांवर तालिबानचे सैनिक नागरिकांची चौकशी करीत आहेत. त्यामुळे तेथून बाहेर पडण्यासाठी हजारो नागरिक धडपडत आहेत. काबूल विमानतळ परिसरात प्रचंड गर्दी आणि गोंधळ आहे. अमेरिका, भारतासह अनेक देशांचे नागरिक विमानतळावर तिष्ठत आहेत. अमेरिकेने आपल्या नागरिकांना संभाव्य धोक्याबद्दल सतर्कतेचा इशारा दिला आहे.

भारतीयांच्या अपहरणाची अफवा

नवी दिल्ली : तालिबानी सैनिकांनी शनिवारी सकाळी काबूल विमानतळाकडे निघालेल्या सुमारे १५० भारतीयांना अज्ञात ठिकाणी नेऊन त्यांची कागदपत्रे तपासून लगेचच त्यांना सोडून दिले; परंतु या प्रकारानंतर भारतीयांचे अपहरण झाल्याची अफवा पसरली होती. काबूल विमानतळ परिसरातून तालिबान्यांनी १५० भारतीयांचे अपहरण केल्याचे वृत्त ‘काबूल नाऊ’ या संकेतस्थळाने दिले होते. त्यानंतर भारतीयांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करण्यात आली होती; परंतु या वृत्त संकेतस्थळाने नंतर सर्व भारतीय नागरिकांना मुक्त करण्यात आल्याचे आणि ते सुरक्षित असल्याचे स्पष्ट केले. काबूलमध्ये एकाही भारतीयाचे अपहरण केलेले नाही, सर्व सुरक्षित आहेत, असे भारतीय अधिकाऱ्यांनीही स्पष्ट केले. तालिबानी प्रवक्त्यानेही भारतीयांच्या अपहरणाचे वृत्त फेटाळले. आम्ही भारतीयांचे अपहरण केले नव्हते, तर त्यांना सुरक्षित स्थळी नेले होते. अपहरणाचे वृत्त निराधार आहे, तालिबान अशी कृती कधीच करणार नाही, सर्व भारतीय सुरक्षित आहेत, असे तालिबानी प्रवक्ता अहमद्दुल्ला याने स्पष्ट सांगितले. दरम्यान, शनिवारी अफगाणिस्तानातून ८० भारतीयांना लष्कराच्या खास विमानाने मायदेशी आणण्यात आले, तर २०० भारतीयांना आधीच हलवण्यात आले आहे.

‘तालिबानच्या आव्हानासाठी सज्ज’  

श्रीनगर : तालिबान राजवटीमुळे उद्भवणाऱ्या धोक्यासह जम्मू काश्मीरमधील कोणतीही सुरक्षा आव्हाने पेलण्यास काश्मीर पोलिसांसह सर्व संरक्षण दले सज्ज असल्याचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी शनिवारी स्पष्ट केले.