इंटेल कंपनीचे सहसंस्थापक गॉर्डन मूर यांचं आज हवाई येथे निधन झालं आहे. ते ९४ वर्षांचे होते. इंटेल कंपनी आणि गॉर्डन मूर फाउंडेशनने यासंदर्भात संयुक्त निवेदन जारी करत माहिती दिली आहे. सेमीकंडक्टरची निर्मिती आणि आजच्या काळात वापरले जाणारे संगणक विकसित करण्यात मूर यांचं मोठं योगदान होतं. हेही वाचा - Snapdragon 685 प्रोसेसर असलेला जगातील पहिला स्मार्टफोन ‘या’ दिवशी होतोय भारतात लॉन्च, किंमत आहे फक्त… गॉर्डन अर्ले मूर यांचा जन्म ३ जानेवारी १९२९ रोजी सॅन फ्रान्सिस्को येथे झाला. मूर यांनी सेमीकंडक्टरची डिझाइन आणि त्याच्या निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. मूर यांनी १९६८ साली काही सहकाऱ्यांसह इंटेल कंपनीची स्थापना केली. या कंपनीचे नाव पूर्वी इंटिग्रेटेड इलेक्ट्रॉनिक्स असे होते. मूर हे १९७९ मध्ये इंटेलचे सीईओ बनले. त्यांनी आठ वर्षे सीईओ म्हणून काम केले. मूर यांनी शेवटच्या काही वर्षात स्वत:ला सामाजिक आणि शैक्षणिक कार्यात वाहून घेतलं होतं. गेल्या वर्षी इंटेलने त्यांच्या सन्मानार्थ ओरेगॉन येथील कार्यालयाला गॉर्डन मूर पार्क असं नाव दिलं होतं. हेही वाचा - ChatGPT ने भारतविषयी सांगितल्या ‘या’ १० गोष्टी; ज्या तुम्हालाही माहिती नसतील, जाणून घ्या दरम्यान, मूर यांच्या निधनानंतर गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी शोक व्यक्त केला. मूर हे अनेकांसाठी प्रेरणास्थान होते. त्यांच्या निधानाने तंत्रज्ञान क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या कुटुंबियांप्रती माझ्या संवेदना आहेत, असे ते म्हणाले. याबरोबच अॅपलचे सीईओ टीम कूक यांनीही मूर यांच्या निधनानंतर प्रतिक्रिया दिली. मूर यांच्या निधनाने तंत्रज्ञान क्षेत्रात क्रांती घडवणारे एक द्रष्टे व्यक्तीमत्त्व जगाने गमावले आहे. त्यांच्या कुटुंबियांप्रती माझ्या संवेदना आहेत, त्यांच्या आत्म्याला शांती लाभो, असे ते म्हणाले.