माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांना सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) अटक करण्यात आली आहे. ईडीच्या तीन सदस्यांच्या टीमकडून पी चिदंबरम यांची तिहार जेलमध्ये चौकशी करण्यात आली. जवळपास एक तास पी चिदंबरम यांची चौकशी सुरु होती. चौकशीनंतर पी चिदंबरम यांना अटक करण्यात आली. मंगळवारी विशेष न्यायालयाने ईडीला पी चिदंबरम यांची चौकशी तसंच अटकेची परवानगी दिली होती. मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी पी चिदंबरम ५ सप्टेंबरपासून तिहार जेलमध्ये आहेत.

आज सकाळी ईडीचं पथक पी चिदंबरम यांची चौकशी करण्यासाठी तिहार जेलमध्ये पोहोचलं होतं. जवळपास एक तास पी चिदंबरम यांची चौकशी सुरु होती. यादरम्यान चिदंबरम यांचा मुलगा आणि काँग्रेस खासदार कार्ती चिदंबरम आई नलिनसोबत पोहोचले होते. ईडीने पी चिदंबरम यांच्या अटकेची मागणी केली होती. यावर न्यायालयाने त्यांना चौकशीची परवानगी दिली. तसंच चौकशीदरम्यान हाती लागलेल्या माहितीच्या आधारे अटक करण्याचा निर्णय ईडी घेऊ शकतं असंही सांगितलं होतं.

विशेष न्यायाधीश अजय कुमार कुहार यांनी निर्णय सुनावताना सांगितलं होतं की, “मनी लॉण्ड्रिंग प्रकरणातील आरोपीविरोधात जर सबळ पुरावे असतील तर ईडी अटकेची कारवाई करु शकतं. यामध्ये न्यायालयाने मध्यस्थी करण्याची गरज नाही. पण आरोपी आधीच एखाद्या प्रकरणात अटकेत असेल तर चौकशीसाठी परवानगी घेणं गरजेचं आहे”. पुढे त्यांनी सांगितलं होतं की, “न्यायालयाच्या परवानगीसोबतच अशा चौकशीदरम्यान अटक करण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली तर तसं केलं जाऊ शकतं”.

दरम्यान कार्ती चिदंबरम यांनी वडिलांची भेट घेतल्यानंतर बोलताना सांगितलं की, “मी माझ्या वडिलांना भेटण्यासाठी आलो होतो. ते व्यवस्थित आहेत. हे जे काही सुरु आहे हे सगळं राजकीय षडयंत्राचा भाग आहे. हा अत्यंत बोगस तपास आहे”.

सीबीआय अपमान करण्याचा प्रयत्न करत आहे
याआधी पी चिदंबरम यांनी सर्वोच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज करताना सीबीआय आपला अपमान करण्यासाठी जेलमध्ये ठेऊ इच्छित आहे असा आरोप केला होता. चिदंबरम यांच्यातर्फे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवी यांनी जामीन याचिका दाखल केली आहे.