देशात सध्या करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. आयपीएलवरसुद्धा करोनाचे गडद सावट आल्याने ही स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवारी कोलकाता संघाच्या दोन खेळाडूंना करोनाची लागण झाल्यानंतर बंगळुरुसोबत होणारा सामना पुढे ढकलावा लागला. दरम्यान चेन्नईच्याही तिघांना करोनाची लागण झाली आहे. मंगळवारी हैदराबादचा वृद्धिमान साहा यालाही करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. या पार्श्वभूमीवर आयपीएलने स्पर्धा स्थगित करत असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे आयपीएलचे आयोजन करणाऱ्या बीसीसीआयचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे.

आयपीएलच्या स्पर्धा स्थगित झाल्याने बीसीसीआयचं २००० कोटी रुपयांच नुकसान होण्याची शक्यता आहे. तसेच या वर्षी भारतात होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपचे सामने देखील रद्द होण्याची शक्यता आहे. जर भारताकडून या स्पर्धेचे यजमानपद काढल्यावर बीसीआयचे यावर्षी मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होणार आहे.

यंदाच्या आयपीएलच्या स्पर्धांचे आयोजन हे गेल्या वर्षी प्रमाणे युएईमध्ये करण्यात यावं असं आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलचं म्हणणं होतं. जर आयपीएलचे सामने परदेशात खेळवले असते तर ही स्पर्धा स्थगित झाली नसती. देशात करोनाचा कहर सुरू असताना देखील आयपीएलचे आयोजन करण्यात आले होते. ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपसाठी भारत तयार असल्याचे यामधून बीसीसीय सुचवू पाहत होते. मात्र आता आयपीएल रद्द झाल्याने टी-२० वर्ल्ड कपच्या आयोजनाबाबत शंका व्यक्त केली जात आहे. गेल्या वर्षी या स्पर्धा परदेशात खेळवल्या गेल्याने आयपीएलची ब्रँड व्हॅल्यू ३.६ टक्क्यांनी घसरली होती.

आयपीएलमुळे बीसीसीआयच्या महसुलात मोठ्या प्रमाणात वाढ होते. यामुळे सरकारलासुद्धा योग्य वेळेत कर मिळतो. बीसीसीआयने २००७-०८ पासून सरकारला  ३५०० कोटी रुपये कररुपाने दिले आहेत. आयपीएलपूर्वी बीसीसीआय ही एक सेवाभावी संस्था मानली जात होती. बीसीसीआयने लीगमधून ४०% कमाई अधिक कमाई केली आहे.

टेलीग्राफच्या अहवालानुसार, जागतिक क्रिकेटची अर्थव्यवस्था सुमारे १५ हजार कोटी रुपये आहे. यातील ३३% म्हणजे ५ हजार कोटी रुपये आयपीएलच्या स्पर्धांमधून येतात. यामुळेच आयपीएल स्पर्धेदरम्यान बीसीसीआयला जगातील इतर क्रिकेट बोर्डांचे सहकार्य मिळते.