हरियाणाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (एडीजीपी) वाय. पूरन कुमार हे मंगळवारी (७ ऑक्टोबर) त्यांच्या चंदीगडच्या सेक्टर ११ मधील राहत्या घरात मृतावस्थेत आढळले. त्यांच्या डोक्यात गोळी लागली होती. त्यांनी आत्महत्या केली असावी असा संशय पोलिसांनी प्राथमिक तपासानंतर व्यक्त केला आहे. या घटनेने देशभर एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी तपास केल्यानंतर त्यांना पूरन कुमार यांचं मृत्यूपत्र व एक सुसाइड नोट सापडली आहे. दरम्यान या प्रकरणी आता कुटुंबाने त्यांच्या मृत्यूला पाच दिवस झाले तरीही आम्हाला न्याय का मिळाला नाही? असा सवाल केला आहे.

पूरन कुमार यांच्या भावाने काय म्हटलं आहे?

पूरन कुमार यांचे भाऊ अमित रतन म्हणाले, माझ्या भावाने ७ ऑक्टोबरला आत्महत्या करुन आयुष्य संपवलं. एका डीजीपी दर्जाच्या अधिकाऱ्याचा असा मृत्यू झाला आहे, पाच दिवस झाले आहेत पण आम्हाला न्याय मिळालेला नाही. पूरन कुमार यांनी त्यांच्या निवासस्थानी स्वतःवर गोळी झाडून घेतली. त्यांची एक सुसाईड नोटही मिळाली आहे.

पूरन कुमार यांची सुसाईड नोट मिळाल्याचीही माहिती

पूरन कुमार यांनी सुसाइड नोटमध्ये कार्यालयातील समस्यांचा उल्लेख केला आहे. तसेच ते कामाच्या ठिकाणी समाधानी नसल्याचं त्यांच्या पत्रातून स्पष्ट झालं आहे. या सुसाइड नोट फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आली आहे. पूरन कुमार हे २००१ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. कुमार हे हरियाणा केडरमधील वरिष्ठ आयपीएस अधिकारी होते. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक महत्त्वाची पदं भूषवली होती. त्यांनी सोमवारी त्यांच्या गनमॅनकडून पिस्तूल (सर्व्हिस रिव्हॉल्वर) घेतलं. त्यानंतर मंगळवारी दुपारी ते त्यांच्या घरातील बेसमेंटमध्ये (तळघर) मृतावस्थेत आढळले. त्यांच्या डोक्याला गोळी लागली होती आणि हातात त्यांची सर्व्हिस रिव्हॉल्वर होती.

पूरन यांच्या पत्नीही सनदी अधिकारी

दरम्यान या प्रकरणानंतर चंदीगढ पोलीस ठाण्यात हरियाणाचे डीजीपी शत्रुजीत सिंह आणि रोहतकचे एसपी नरेंद्र बिजारनिया यांना अटक करण्यात यावी अशीही मागणी होते आहे. या प्रकरणी सहा सदस्यीय तपास समितीही नेमण्यात आली आहे. दरम्यान पोलीस अधिकाऱ्यांच्या अटकेबाबत किंवा त्यांना पदावरुन काढण्याबाबत अद्याप हरियाणा सरकारने निर्णय घेतलेला नाही. वाय. पूरन कुमार यांची पत्नी वरिष्ठ आयएएस अधिकारी आहे. अमनीत पी. कुमार असं त्यांचं नाव असून त्या २००१ च्या बॅचच्या हरियाणा केडरच्या आयएएस अधिकारी आहेत. पूरन कुमार यांनी आत्महत्या केली तेव्हा त्या हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांच्याबरोबर जपान दौऱ्यावर गेल्या होत्या. सैनी यांच्याबरोबर वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांचं एक शिष्टमंडळ जपान दौऱ्यावर गेलं असून अमनीत पी. कुमार या देखील सदर शिष्टमंडळातील सदस्य आहेत.