दुबई : इस्रायल-इराण संघर्षात उडी घेत अमेरिकेने रविवारी पहाटेच्या वेळी इराणमधील तीन अणुकेंद्रांवर हवाई हल्ले चढविले. त्यानंतर काही तासांतच कच्चे तेल आणि वायूच्या व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचा जलमार्ग असलेल्या ‘होर्मुझ खाडी’ची नाकेबंदी करण्याच्या निर्णयाला इराणच्या कायदेमंडळाने मान्यता दिल्याचे समजते. याबाबतचा अंतिम निर्णय राष्ट्रीय सर्वोच्च सुरक्षा समितीवर सोडण्यात आला असला, तरी हा मार्ग बंद झाल्यास त्याचा मोठा फटका भारतासह जगभरातील इंधन पुरवठ्यावर होणार आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘व्हाइट हाऊस’मध्ये पत्रकारांना संबोधित करताना इराणवर हल्ले केल्याचे जाहीर केले. फोर्डो, इश्फाहान आणि नतान्झ या तीन ठिकाणी असलेली इराणची अणुकेंद्रे संपूर्णत: नष्ट केल्याचा दावा त्यांनी केला. त्यानंतर इराणने इस्रायलवर जोरदार क्षेपणास्त्र मारा करतानाच ‘होर्मुझ खाडी’चा जलमार्ग व्यापारासाठी बंद करण्याचा इशारा दिला.
या निर्णयाला कायदेमंडळाने तातडीने मंजुरी दिल्याचे सांगितले जात असून आता सुरक्षा समितीच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे. कायदेमंडळाचा निर्णयही अद्याप अधिकृतरीत्या जाहीर झालेला नाही. या खाडीतून जगातील २० टक्के इंधनाचा व्यापार चालतो. पश्चिम आशियातून भारतात येणारे बहुतांश कच्चे तेल याच मार्गाने आणले जाते. त्यामुळे हा मार्ग बंद झाल्यास त्याचा देशातील इंधन पुरवठ्याला मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे.
दरम्यान, फोर्डो, इश्फाहान आणि नतान्झ या अणुकेंद्रांवर हल्ला झाल्याचे इराणच्या अणुऊर्जा संस्थेने मान्य करतानाच यामुळे आपला अणू कार्यक्रम थांबणार नसल्याचे म्हटले आहे. तसेच या तिन्ही ठिकाणी किरणोत्सर्गाचे पुरावे अद्याप मिळाले नसल्याचे इराण तसेच संयुक्त राष्ट्रांच्या अणुऊर्जा संस्थांनी स्पष्ट केले. दुसरीकडे अमेरिकेने प्रत्यक्ष युद्धात उडी घेतल्यानंतर इराणकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त झाली.
इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी या हल्ल्यांचा निषेध करताना भविष्यात घडणाऱ्या घटनांना संपूर्णत: अमेरिका जबाबदार असेल, असे म्हटले आहे. ते लवकरच मॉस्को येथे जाऊन रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचीही भेट घेणार आहेत. दुसरीकडे, इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी ट्रम्प यांच्यावर स्तुतिसुमने उधळत अमेरिकेने केलेल्या हल्ल्याचे स्वागत केले.
इराण आणि इस्रायल-अमेरिका टोकाची भाषा करत असताना युद्धाचा आणखी भडका उडण्याची भीती व्यक्त होत आहे. जगभरातील नेत्यांनी तिन्ही देशांना चर्चेतून मार्ग काढण्याचे आवाहन केले असले, तरी सद्य:स्थितीत तशी शक्यता कमी असल्याचे मानले जात आहे.
आम्ही इराणमधील तीन अणुकेंद्रांवर अतिशय यशस्वी हल्ले केले आहेत. मुख्यत: फोर्डोच्या केंद्रावर विमानातील सर्व बॉम्ब टाकण्यात आले. हा अमेरिकेसाठी ऐतिहासिक क्षण आहे. इराणने आता युद्ध संपविण्यासाठी तातडीने तयार व्हावे. – डोनाल्ड ट्रम्प, अध्यक्ष, अमेरिका
इराणवरील हल्ल्यांचे जे परिणाम होतील त्याची संपूर्ण जबाबदारी अमेरिकेवरच असेल. ‘युद्धखोर, बेकायदा’ ट्रम्प प्रशासनाने इराणच्या अणुकेंद्रांवर हल्ले करून कोणतीही मर्यादा ओलांडायची शिल्लक ठेवली नाही. अमेरिकेचे हे कृत्य धोकादायक आहे. – अब्बास अराघची, परराष्ट्रमंत्री, इराण
अमेरिकेची प्रचंड लष्करी ताकद वापरून इराणी अणुकेंद्रांना लक्ष्य करण्याच्या तुमच्या (ट्रम्प यांच्या) धाडसी निर्णयामुळे इतिहासाला कलाटणी मिळणार आहे. जगातील कोणताही अन्य देश करू शकत नाही, ते अमेरिकेने करून दाखविले आहे. – बिन्यामिन नेतान्याहू, पंतप्रधान, इस्रायल