Israel Iran Tensions : इस्रायलने १ एप्रिल रोजी इराणच्या सीरियामधील दूतावासावर हल्ला केल्यानंतर या दोन्ही देशांतील तणाव शिगेला पोहोचला आहे. या हल्ल्यात दोन लष्करी अधिकाऱ्यांसह ‘रिव्हॉल्यूशनरी गाडर्स्’चे सात कर्मचारी मारले गेले होते. या हल्ल्याचा बदला घेण्याची धमकी इराणने दिल्यानंतर शनिवारी इस्रायलशी संबंधित जहाज ताब्यात घेण्यात आले. तर रविवारी पहाटे इराणने इस्रायलवर क्षेपणास्रे डागून अघोषित युद्धाला सुरुवात केली आहे. इराणच्या या कृत्यामुळे या दोन्ही देशांत वाद आता चिघळण्याची शक्यता असून जग पुन्हा युद्धच्या छायेत जाण्याची शक्यता आहे.
Israel’s War on Gaza Live : इराण-इस्रायल यांच्या संघर्षातील महत्त्वपूर्ण घडामोडी वाचा
इराण हा हमासचा वित्तपुरवठादार, प्रशिक्षक आहे. काल इराणने इस्रायलवर थेट हल्ला केला. त्यांनी आमच्या प्रदेशातील काही मित्रांच्या मदतीने ३३१ वेगवेगळ्या प्रकारची रॉकेट, क्रूझ क्षेपणास्त्रे डागली. परंतु बहुतेक इस्त्रायली संरक्षण दल आणि हवाई दलाच्या क्षमतेमुळे आम्ही ९९ टक्के हा हल्ला रोखू शकलो. आम्हाला प्रादेशिक वाढ नको आहे. पण आमच्यावर कोणी हल्ला करत असेल तर आम्ही पाहत बसू शकत नाही. आम्ही प्रत्युत्तर देणारच. इराणने हल्ला केल्यामुळे आमची प्रतिक्रिया ते पाहतीलच - नाओर गिलॉन, इस्रायलचे भारतातील राजदूत
आम्ही हल्ले थांबवले, आम्ही हल्ले परतवले, आम्ही एकत्रिपणे निश्चित जिंकू- बेंजामिन नेतन्याहू, इस्रायलचे पंतप्रधान
“इराणच्या राजवटीच्या इस्रायलवर केलेल्या बेपर्वा हल्ल्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो.
आपल्याच अंगणात अराजकता पेरण्याचा इरादा असल्याचे इराणने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. यूके इस्रायल, जॉर्डन आणि इराकसह आमच्या सर्व प्रादेशिक भागीदारांच्या सुरक्षेसाठी उभा राहील. परिस्थिती स्थिर करण्यासाठी आणि पुढील वाढ रोखण्यासाठी आम्ही तातडीने काम करत आहोत. आणखी रक्तपात कोणीही पाहू इच्छित नाही - ऋषी सुनक, ब्रिटनचे पंतप्रधान
इराणने हल्ला केल्यानंतर हवाई क्षेत्र बंद करण्यात आलं होतं. आता पुन्हा हवाई क्षेत्र सुरू केले असल्याचं विमानतळ प्राधिकारणाकडून कळवण्यात आले असल्याचं वृत्त रॉयटर्सने दिलं आहे.
रॉयटर्सने इस्रायली मंत्रालयाच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, इराणने इस्रायलवर रात्रभर ३०० हून अधिक प्रोजेक्टाइल डागले आणि त्यापैकी ९९ टक्के प्रोजेक्टाइल रोखण्यात आले. तसंच, इराण व्यतिरिक्त इराक आणि येमेनमधूनही काही क्षेपणास्त्र डागण्यात आल्याचे इस्रायली लष्कराने म्हटले आहे.
इराणने इस्रायलवर शेकडो क्षेपणास्र डागून जग पुन्हा एकदा अशांत केलं आहे. इस्रायलवरील हल्ल्याबाबत इराणने आधीच इशारा दिला होता. त्यानुसार, भारतासह अनेक देशांनी आपल्या नागरिकांना पश्चिम आशियायी देशांत जाण्यापासून रोखले होते. आता इराणने इस्रायलवर हल्ला केल्यानंतर भारताने आपली भूमिका जाहीर केली आहे. दोन्ही देशांना संयम राखण्याचे आवाहन करण्यात आले असून या देशातील भारतीय समुदायांच्या संपर्कात असल्याचं इस्रायलमधील परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.
इराणने इस्रायलवर ड्रोन हल्ला केला तेव्हा अमेरिकेने इस्रायलला मदत केली, असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन म्हणाले आहेत. तसंच, संयुक्तिक राजनैतिक प्रतिसादासाठी अमेरिकेने श्रीमंत राष्ट्रांच्या जी ७ देशातील सहकाऱ्यांची त्यांनी बैठक बोलावली आहे. इराण, येमेन आणि सीरियातून कार्यरत असलेल्या इस्रायलमधील लष्करी सुविधांवर अभूतपूर्व हवाई हल्ला केल्याचा मी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करतो, असं जो बायडेन म्हणाले.
इराण आणि इस्रायल यांच्यातील तणाव वाढला असून इराणच्या ‘रिव्हॉल्युशनरी गार्ड्स’ने शनिवारी संयुक्त अरब अमिरातीहून (यूएई) भारताकडे येणाऱ्या एका मालवाहू जहाजाचा ताबा घेतला. हे जहाज इस्रायलशी संबंधित असून हेलिकॉप्टरच्या मदतीने कमांडो जहाजावर उतरले, असे वृत्त इराणच्या सरकारी ‘आयआरएए’ या वृत्तसंस्थेने दिले आहे. या जहाजातील १७ कर्मचारी भारतीय असून त्यांच्या सुटकेसाठी भारत सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत.
इराण आणि इस्रायल यांच्यातील तणाव वाढत असून इराणने त्यांच्या हद्दीतून इस्रायलवर ड्रोन आणि क्षेपणास्र हल्ला चढवला आहे. इराणमधून १०० हून अधिक ड्रोन सोडण्यात आले, असं इस्रायलच्या सैन्यांनी सांगितलं आहे.
Israel’s War on Gaza Live : इराण-इस्रायल यांच्या संघर्षातील महत्त्वपूर्ण घडामोडी वाचा