वृत्तसंस्था, तेल अवीव/तेहरान

इस्रायलच्या तेल अवीव, जेरुसलेम, हायफा आदी महत्त्वाच्या शहरांमध्ये सोमवारी पहाटेच्या वेळी क्षेपणास्त्रांनी मोठ्या प्रमाणात नुकसान केले. त्यानंतर इस्रायलची अत्याधुनिक हवाई सुरक्षा प्रणाली (आयर्न डोम) भेदण्यासाठी नवे तंत्र वापरात आणल्याचा दावा इराणी सैन्यदलाने केला. यामुळे अत्यंत नावाजलेल्या या सुरक्षा प्रणालीतील कच्चे दुवे समोर आल्याचे मानले जात आहे.

इस्रायलने शुक्रवारी पहाटे इराणमधील अणुऊर्जा आस्थापना आणि वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांना लक्ष्य करून हल्ले केले. प्रत्युत्तरादाखल इराणने क्षेपणास्त्रांचा मारा सुरूच ठेवला असून सोमवारी पहाटेच्या वेळी इस्रायलमधील प्रमुख शहरांमधील नागरी वस्त्यांना लक्ष्य केले गेले. यामुळे ‘आयर्न डोम’ प्रणालीच्या उपयुक्ततेबाबत चर्चा सुरू झाली ॅ़ळ असताना इराणच्या ‘रिव्हॉल्युशनरी गार्ड’कडून नवे तंत्र वापरात आणल्याचा दावा समाजमाध्यमांवर करण्यात आला आहे. हे नवे तंत्र नेमके काय आहे, हे स्पष्ट करण्यात आले नसले तरी यामुळे इस्रायलची बहुस्तरीय सुरक्षा यंत्रणा एकमेकांनाच लक्ष्य करत असून त्यामुळे आपली क्षेपणास्त्रे विनासायास लक्ष्यभेद करत असल्याचे इराणी लष्कराचे म्हणणे आहे. अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांचा संपूर्ण पाठिंबा असताना आणि सर्वांत अत्याधुनिक संरक्षण तंत्रज्ञान असतानाही इस्रायलमधील लक्ष्यांवर अचूक हल्ले करण्यात आल्याचे इराणने म्हटले आहे. याबाबत इस्रायली लष्कर किंवा सरकारकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नसली, तरी ‘आयर्न डोम’ प्रणाली १०० टक्के सुरक्षित नसल्याचे वेळोवेळी सांगण्यात आले आहे. असे असले तरी, इराणने केलेल्या ताज्या हल्ल्यांमध्ये इस्रायलला मोठे नुकसान सहन करावे लागत असून मनुष्यहानी होण्याचा धोकाही वाढला आहे.

इस्रायलवरील पोलादी छत

●‘आयर्न डोम’ नावाने ओळखली जाणारी इस्रायलची हवाई सुरक्षा यंत्रणा ही बहुस्तरीय काम करते.

●लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे (इराण, येमेनमधून डागलेली) भेदण्यासाठी ‘द अॅरो’ ही प्रणाली वापरली जाते.

●लेबनॉनसारख्या शेजारी देशातून आलेली मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्रे ‘डेव्हिड्स स्लिंज’ वापरून नष्ट केली जातात.

●‘आयर्न डोम’ हेच नाव असलेली तिसरी यंत्रणा कमी पल्ल्याची क्षेपणास्त्रे, ड्रोन भेदते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

●विशेष म्हणजे, ‘बुद्धिमत्ता आधारित जोखीम पडताळणी’द्वारे केवळ सर्वाधिक नुकसान करणारी क्षेपणास्त्रेच हवेत नष्ट केली जातात.