इराणच्या सीमेवरुन पाकिस्तानमध्ये उखळी तोफांचा मारा करण्यात आला आहे. ‘बिझनेस स्टॅंडर्ड’ने दिलेल्या वृत्तानुसार पाकिस्तान आणि इराण या दोन देशांमध्ये साधारणतः ९०० किलोमीटरहून अधिक अंतर आहे. तरीही दोन्ही देशांकडून सातत्याने हल्ले होत असल्याच्या घटना समोर येतात.
इराण आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी २०१४ मध्ये आपापल्या गुप्तचर यंत्रणांच्या साह्याने सीमाभागातील दहशतवाद मोडीस काढण्याचे ठरविले होते. त्यासाठी विशिष्ट यंत्रणाही कार्यरत कऱण्यात आली होती. मात्र त्याचा फारसा उपयोग होत नसल्याचे चित्र आहे.
या दोन देशांत असणाऱ्या सीमेवरील मार्गाचा व्यापारी मार्ग म्हणून अनेक वर्षांपासून वापर केला जातो. इतकेच नाही तर हजारो परदेशी नागरिक आणि स्थानिक लोकही या मार्गाचा प्रवासासाठी वापर करतात. त्यामुळे येथील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे.
नुकतेच इराणच्या सीमा सुरक्षादलातील १० जणांना ठार करण्यात आले होते. हा हल्ला पाकिस्तान पुरस्कृत सुन्नी दहशतवादी, जैश-अल-अदल किंवा पाकिस्तानी लष्कराकडून करण्यात आलाचा संशय आहे. इराण पोलिसांच्या सांगण्यानुसार या जवानांना लॉंग रेंज गनने मारण्यात आले होते.