Israel Iran Tensions : इराणने इस्रायलवर शेकडो क्षेपणास्र डागून जग पुन्हा एकदा अशांत केलं आहे. इस्रायलवरील हल्ल्याबाबत इराणने आधीच इशारा दिला होता. त्यानुसार, भारतासह अनेक देशांनी आपल्या नागरिकांना पश्चिम आशियायी देशांत जाण्यापासून रोखले होते. आता इराणने इस्रायलवर हल्ला केल्यानंतर भारताने आपली भूमिका जाहीर केली आहे. दोन्ही देशांना संयम राखण्याचे आवाहन करण्यात आले असून या देशातील भारतीय समुदायांच्या संपर्कात असल्याचं इस्रायलमधील परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी यासंदर्भात एक्सवर भारताच्या बाजूचं निवेदन सादर केलं आहे. “इस्रायल आणि इराण यांच्यातील वाढत्या शत्रुत्वाबद्दल आम्ही गंभीरपणे चिंता व्यक्त करत आहोत. या प्रदेशातील शांतता आणि सुरक्षितता धोक्यात आली आहे”, असं भारताने या निवेदनात म्हटलं आहे.

हेही वाचा >> इराणचा इस्रायलवर हवाई हल्ला, शेकडो ड्रोन आणि क्षेपणास्रे डागली! UN मध्ये आज तातडीची बैठक

“आम्ही तात्काळ डी-एस्केलेशन, संयम बाळगणे, हिंसाचारापासून मागे हटणे आणि मुत्सद्देगिरीच्या मार्गावर परत जाण्याचे आवाहन करतो. आम्ही सध्याच्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. या प्रदेशातील आमचे दूतावास भारतीय समुदायाच्या संपर्कात आहेत. प्रदेशात सुरक्षा आणि स्थिरता राखणे अत्यावश्यक आहे”, असंही भारताने म्हटलं आहे.

भारताने जारी केली होती सूचना

इस्रायलने ११ दिवसांपूर्वी इराणच्या सिरीयातील दूतावासावर हल्ला केला होता. त्यानंतर या दोन देशांतील तणाव कमालीचा शिगेला पोहोचला असून पश्चिम आशियावर युद्धाचे ढग दाटले आहेत. त्यामुळे अमेरिकेसह काही देशांनी आपापल्या नागरिकांना इराण आणि इस्रायलचा प्रवास टाळण्याचा सल्ला दिला होका. भारतानेही शुक्रवारी मार्गदर्शक सूचना जारी करून भारतीयांना खबरदारीचा इशारा दिला. इराण आणि इस्रायलबरोबरच भारतीयांनी म्यानमारलाही जाणे टाळावे, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले होते. म्यानमारच्या सित्वे शहरातील सुरक्षाविषयक परिस्थिती अस्थिर असल्याने तेथील वाणिज्य दूतावासातील कर्मचाऱ्यांना यांगून शहरात हलवण्यात आले आहे. भारत म्यानमारमधील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले.

हेही वाचा >> Iran Attack Israel Live : इस्रायलवरील क्षेपणास्रांचा मारा रोखण्यासाठी अमेरिकेची मदत

इस्रायल आणि इराणमध्ये राहणाऱ्या भारतीयांनी स्वत:च्या सुरक्षेबद्दल दक्षता घ्यावी आणि आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे, असेही मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद करण्यात आले आहे. सध्या इराण किंवा इस्रायलमध्ये राहणाऱ्या सर्वांनी तेथील भारतीय दूतावासांशी संपर्क साधून आपल्या नवाची नोंदणी करावी, असे आवाहनही परराष्ट्र मंत्रालयाने केले आहे.