इराणने इराकमधील अमेरिकेच्या दोन तळांवर क्षेपणास्त्र हल्ला केला. त्याचदिवशी अपघाताने युक्रेनचे एक प्रवासी विमान पाडले होते. या घटनेमध्ये विमानातील १७६ प्रवाशांचा मृत्यू झाला. या प्रकरणात आता काही जणांना अटक करण्यात आली आहे अशी माहिती इराणच्या न्यायसंस्थेने दिली आहे.

तेहरानमधून या विमानाने उड्डाण केल्यानंतर काही मिनिटात हे विमान पाडण्यात आले. इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी हे विमान कसे पाडले ? त्याची चौकशी करण्यासाठी विशेष कोर्ट स्थापन करण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर या प्रकरणात काही जणांना अटक करण्यात आल्याची माहिती इराणच्या न्यायसंस्थेने दिली.

या प्रकरणी तपास सुरु झाला असून, काही जणांना अटक करण्यात आली आहे. नेमके किती जणांना ताब्यात घेतलेय, त्यांची नावे काय आहेत याबद्दल न्यायसंस्थेच्या प्रवक्त्याने काहीही माहिती दिलेली नाही. सुरुवातील इराणने क्षेपणास्त्राद्वारे युक्रेनचे प्रवासी विमान पाडल्याचा आरोप फेटाळला होता. पण नंतर तीन दिवसांनी विमान पाडल्याचा आरोप मान्य केला. ही साधीसुधी घटना नाही. संपूर्ण जगाचे या कोर्टाच्या सुनावणीकडे लक्ष असणार आहे असे इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रौहानी म्हणाले.