Iran’s supreme leader Ayatollah Ali Khamenei: इराण-इस्रायलमध्ये १२ दिवसांच्या सशस्त्र संघर्षानंतर युद्धविरामाची घोषणा करण्यात आली. त्यानंतर आता पहिल्यांदाच इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खोमेनी यांनी यावर भाष्य केले आहे. इराणच्या जनतेला व्हिडीओद्वारे संबोधित करण्यापूर्वी त्यांनी एक्सवर काही पोस्ट शेअर केल्या आहेत. ज्यात त्यांनी इस्रायलवर विजय मिळाल्याचा दावा केला आहे.
खोमेनी यांनी आपल्या एक्सवरील पोस्टमध्ये इस्रायलचा थेट उल्लेख केलेला नाही. मात्र त्यांचा उल्लेख ‘भ्रामक झियोनिस्ट राजवट’ असा केला आहे.
तसेच खोमेनी यांनी अमेरिकेलाही इशारा दिला. ते म्हणाले, जर त्यांनी पुन्हा इराणवर हल्ला केला तर त्यांना जास्त किंमत मोजावी लागेल. इराणला या प्रदेशातील (आखाती देश) प्रमुख अमेरिकन केंद्रापर्यंत प्रवेश मिळाला आहे. भविष्यात गरज पडल्यास ते पुन्हा हल्ला करू शकतात.
खोमेनी यांनी आपल्या एक्स हँडलवर अनेक पोस्ट शेअर केल्या आहेत. एका पोस्टमध्ये त्यांनी म्हटले की, माझ्या प्रिय इराणने अमेरिकेवर विजय मिळविला आहे. त्याबद्दल मी अभिनंदन व्यक्त करतो. अमेरिकेने या युद्धात थेट प्रवेश केला. झिओनिस्ट राजवट पूर्णपणे नष्ट होईल, असे वाटल्यामुळेच त्यांनी असे केले असावे. त्यांनी झिओनिस्ट राजवटीला वाचविण्याचा प्रयत्न केला. पण त्यात काहीही साध्य झाले नाही.
अमेरिकेला जोरदार चपराक
इराणने कतारमधील अमेरिकेच्या हवाई तळावर केलेल्या हल्ल्याचाही उल्लेख खोमेनी यांनी केला. या हल्ल्यात अमेरिकेच्या हवाई तळाचे मोठे नुकसान झाल्याचा दावा त्यांनी केला. इराणच्या इस्लामिक राजवटीने अमेरिकेच्या थोबाडावर जोरदार चपराक लगावली आहे. इराणने अल-उदेइद हवाई तळावर हल्ला केला आणि त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले.
खोमेनी यांनी पुढे स्पष्ट केले की, इराण अमेरिकेच्या तळांवर पुन्हा हल्ला करण्याची क्षमता ठेवतो. आम्हाला जेव्हा आवश्यकता वाटेल तेव्हा पुन्हा हल्ला करू, ही बाबही त्यांनी अधोरेखित केली.
यावेळी खोमेनी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘बिनशर्त शरणागती’ या विधानाचीही खिल्ली उडवली. ते म्हणाले, एवढे मोठे विधान आता पुन्हा कधीही अमेरिकेन अध्यक्षांच्या तोंडून बाहेर पडणार नाही.