Iran Calls Donald Trump Gambler: गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या इराण-इस्रायल लष्करी संघर्षात काल अमेरिकेने उडी घेतली असून, इराणच्या अणु प्रकल्पांवर हवाई हल्ले केले आहेत. अमेरिकेच्या या हल्ल्यांवर जगभरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. इराणनेही अमेरिकेच्या या हल्ल्यांना प्रत्युत्तर देणार असल्याचे म्हटले आहे. अशात आता इराणच्या लष्करी प्रवक्त्याने सोमवारी अमेरिकेला कडक इशारा दिला आहे.
एका व्हिडिओ निवेदनात इराणच्या लष्करी प्रवक्त्याने म्हटले आहे की, अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे इराणकडे कायदेशीरपणे हल्ले करण्याचे पर्याय वाढले आहेत.
इराणच्या खातम अल-अंबिया केंद्रीय लष्करी मुख्यालयाचे प्रवक्ते इब्राहिम झोलफकारी यांनी म्हटले आहे की, अमेरिकेला त्यांच्या कृतींचे गंभीर परिणाम भोगावे लागणार आहेत. यावेळी त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘गॅम्ब्लर’ असा उल्लेख करत बदला घेण्याची शपथ घेतली.
झोलफकारी यांनी त्यांच्या व्हिडिओ निवेदनाच्या शेवटी इंग्रजीत म्हटले की, “गॅम्ब्लर मिस्टर ट्रम्प, हे युद्ध तुम्ही सुरू केले असेल, पण ते संपवणारे आम्हीच.”
दरम्यान, इराणच्या लष्कराने आधीच सांगितले आहे की, ते त्यांच्या अणु प्रकल्पांवर अमेरिकेने केलेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देतील.
यापूर्वीच्या एका निवेदनात संयुक्त राष्ट्रांमधील इराणचे राजदूत अमीर सईद इरावनी यांनी म्हटले आहे की, फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान अणु प्रकल्पांवरील अमेरिकेच्या हल्ल्यांना कधी आणि कसे प्रत्युत्तर द्यायचे, हे इराणी सैन्य ठरवेल.
दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी असा दावा केला आहे की, इराणच्या अणु प्रकल्पांवर त्यांनी केलेल्या हल्ल्यांमुळे इराणचे मोठे नुकसान झाले आहे.
ट्रम्प असा दावा करत असले तरी, उपग्रह छायाचित्रांमध्ये इराणच्या अणु प्रकल्पांचे किती प्रमाणात नुकसान झाले आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. याचबरोबर, अनेक तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, इराणने अणु प्रकल्पांमधील युरेनियम हवाई हल्ल्यांच्या आधीच हलवून अमेरिका आणि ट्रम्प यांना वेड्यात काढले असावे.
दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी या हल्ल्यांनंतर इराणने कोणताही बदला घेण्याचे प्रयत्न करू नये, असे म्हटले आहे. त्यांनी म्हटले की, इराण सरकारने आता शांतता प्रस्थापित करावी, अन्यथा भविष्यातील हल्ले खूप मोठे असतील. ट्रम्प यांच्या या विधानामुळे मध्य पूर्वेतील संघर्ष आणखी वाढण्याची चिंता वाढली आहे.
अमेरिकेने इराणच्या तीन अणु प्रकल्पांवर बंकर-बस्टर बॉम्ब आणि दोन डझनहून अधिक टोमाहॉक क्षेपणास्त्रांसह मारा केला, असे जॉइंट चीफ ऑफ स्टाफचे अध्यक्ष जनरल डॅन केन यांनी पत्रकारांना सांगितले.