Indian Roots of Ruhollah Khomeini: इस्रायल-इराण संघर्षात आता अमेरिकेनेही उडी घेतली असून रविवारी इराणच्या तीन अणु प्रकल्पांवर हवाई हल्ला केला. या हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या नेतृत्वात बदल केल्यास हा संघर्ष निवळू शकतो, असे विधान केले आहे. नेतृत्वात बदल करणे म्हणजे इराणचे विद्यमान सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांना पदावरून बाजूला सारणे. अमेरिकेप्रमाणेच इस्रायलनेही काही दिवसांपूर्वी इराकच्या सद्दाम हुसैन यांच्याप्रमाणे अयातुल्ला खामेनी यांची अवस्था करू, अशी धमकी दिली होती. ज्या अयातुल्ला खामेंनी यांच्याबाबत इतकी चर्चा होत आहे, त्या खामेंनीचे पूर्वसुरी असलेले रूहल्ला खामेनी यांचे पूर्वज भारतीय होते. उत्तर प्रदेशच्या बाराबंकी जिल्ह्यातील किंतूर या छोट्याश्या गावातून त्यांचे पूर्वज इराणमध्ये गेले होते. जाणून घेऊया याबद्दलचा इतिहास.
रूहल्ला खामेनी कोण होते?
रूहल्ला खामेनी यांना इराणमध्ये १९७९ साली झालेल्या इस्लामिक चळवळीचे प्रणेते म्हटले जाते. तसेच इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणचे ते संस्थापकही होते. ते इराणचे पहिले सर्वोच्च नेते होते. तसेच विद्यमान नेते अयातुल्ला अली खामेनी यांनीही या चळवळीत हिरीरीने सहभाग घेतला होता. रूहल्ला खामेनी यांचा जन्म १९०२ मध्ये झाला होता, तर त्यांचा मृत्यू १९८९ साली झाली. तर सध्याचे नेते अयातुल्ला खामेनींचा जन्म १९३९ सालचा आहे. ८६ वर्षीय खामेनी इस्रायल आणि अमेरिका या दोन बलाढ्य राष्ट्रांशी लढत देत आहेत.
१८३० साली भारतापासून झाली सुरूवात
रूहल्ला खामेनी यांचे पूर्वज सय्यद अहमद मुसावी हिंदी यांचा जन्म १८३० साली उत्तर प्रदेशच्या बाराबंकी जिल्ह्यातील किंतूर या गावी झाला. ते शिया धर्मगुरू आणि विद्वान म्हणून ओळखले जायचे. ब्रिटिश भारताला सोडून त्यांनी धार्मिक शिक्षण घेण्यासाठी इराणची वाट धरली. इराणमध्ये गेल्यानंतर त्यांनी तिथे आध्यात्मिक आणि धार्मिक कार्य करण्यास सुरूवात केली आणि कालांतराने ते तिथेच स्थायिक झाले. सय्यद अहमद मुसावी यांनी नावापुढे हिंदी हा शब्द जोडून आपली भारतीय ओळख कायम ठेवली.
इराणच्या खामेन या शहरात मुसावी स्थायिक झाले. तिथेच त्यांनी लग्न करून कुटुंब वाढवले. त्यांचा मुलगा मुस्तफा हिंदी हादेखील एक धर्मगुरू बनला. त्यांचा नातू रूहल्ला खामेनी हा पुढे जाऊन इराणच्या राजकीय आणि धार्मिक क्षेत्रात क्रांती करेल, याची या कुटुंबाला तेव्हा कल्पनाही आली नसेल.
१९७९ साली इराणमध्ये इस्लामिक क्रांती झाल्यानंतर शाह राजवटीचा शेवट झाला आणि रूहल्ला खामेनी इराणचे पहिले सर्वोच्च नेते बनले.
अयातुल्ला खामेनींचा उदय
अयातुल्ला खामेनी यांचा जन्म १९३९ साली झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सय्यद जवाद खामेनी होते. त्यांचे वडीलही धार्मिक विद्वान होते. अयातुल्ला खामेनी यांनीही वडिलांप्रमाणेच १९५८ ते १९६४ या काळात धर्मगुरूचे शिक्षण घेतले. शाह राजवटीत त्यांना अनेकदा तुरुंगवास भोगावा लागला होता. १९७९ च्या चळवळीत भाग घेतल्यानंतर १९८१ ते १९८९ काळात ते इराणचे राष्ट्राध्यक्ष झाले.

रूहल्ला खामेनी यांच्या मृत्यूनंतर अयातुल्ला अली खामेनी यांच्याकडे इराणचे सर्वोच्च नेतेपद आले.
किंतूर गावाने आजही जपून ठेवल्यात आठवणी
रूहल्ला खामेनी यांच्या पूर्वजांशी संबंधित असलेले नातेवाईक आजही बाराबंकीच्या किंतूर गावात आहेत. येथील महाल मोहल्ला परिसरात त्यांचे घर आहे. निहाल काझमी, डॉ. रेहान काझमी आणि आदिल काझमी यांनी इंडिया टीव्हीशी बोलत असताना सांगितले की, आमचा वंश इराणच्या प्रमुखपदी पोहोचला होता, याचा आम्हाला अभिमान वाटतो.
काझमी यांच्या घरात खामेनी यांची तस्वीर लावलेली आहे. तसेच्या त्यांच्या नावापुढे हिंदी असे लिहिलेले आहे. जेणेकरून त्यांचे भारताशी नाते स्पष्ट होईल.