Ayatollah Ali Khamenei : इराण आणि इस्त्रायलमधील संघर्ष आता थांबला आहे. अमेरिकेने या संघर्षात थेट उडी घेत इराणच्या ३ अणुकेंद्रावर हवाई हल्ले केले होते. या हल्ल्यात इराणमधील ३ अणुकेंद्र नष्ट केल्याचा दावा अमेरिकेने केला होता. दरम्यान, अमेरिकेने केलेल्या हल्ल्यानंतर इराणनेही कतारमधील अमेरिकेच्या हवाई तळांवर क्षेपणास्त्रे डागत अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. त्यामुळे हा संघर्ष मोठ्या प्रमाणात वाढण्याची चिन्हे निर्माण झाले होते. मात्र, त्यानंतर अखेर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण आणि इस्त्रायलमधील युद्धबंदीची घोषणा केली. त्यामुळे हा संघर्ष आता थांबला.

दरम्यान, इराण आणि इस्त्रायलमधील संघर्षादरम्यान इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी बंकरमध्ये आश्रय घेतल्याचं बोललं जात होतं. त्यामुळे अयातुल्ला अली खामेनी हे कुठेही सार्वजनिक ठिकाणी दिसले नव्हते. मात्र, इराण आणि इस्त्रायलमधील संघर्ष थांबल्यानंतर आता अयातुल्ला अली खामेनी हे शनिवारी पहिल्यांदाच तेहरानमधील एका कार्यक्रमात सार्वजनिक ठिकाणी दिसले आहेत. या संदर्भातील वृत्त रॉयटर्स हवाल्याने इंडिया टुडेनी दिलं आहे.

एका कार्यक्रमात खामेनी सहभागी झाले होते हे तेहरानच्या सरकारी टेलिव्हिजनने फुटेज प्रसारित केल्याचं वृत्तात म्हटलं आहे. जेव्हा खामेनी या कार्यक्रमात सहभागी झाले तेव्हा ते काळ्या पोशाखात दिसत आहेत. तसेच त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या लोकांनी त्यांचं स्वागत जोरदार घोषणाबाजीने केलं. दरम्यान, दोन्ही देशांमधील संघर्षादरम्यान वाढत्या सुरक्षेच्या चिंतेमुळे सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये खामेनी हे दिसून आले नव्हते. तसेच ते नेमकं कुठे आहेत? याची कोणालाही माहिती नव्हती. मात्र, आता संघर्षानंतर पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी दिसले आहेत.

अमेरिकेने इराणच्या कोणत्या ३ अणुकेंद्राव हल्ला केला होता?

अमेरिकेने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात स्टेल्थ बॉम्बर्स आणि जीबीयू-५७ बंकर बस्टर बॉम्ब वापरण्यात आले होते. जे मजबूत भूमिगत टार्गेट करण्यास सक्षम आहेत. अमेरिकेने इराणमधील ३ अणुकेंद्रावर हल्ला करत फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान हे इराणचे ३ अणुकेंद्र नष्ट केल्याचा दावा केला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणनेही दिलं होतं प्रत्युत्तर

इराणने कतारमधील अमेरिकेच्या हवाई तळांवर सहा पेक्षा जास्त क्षेपणास्त्रे डागले होते. अमेरिकेच्या कतारमधील हवाई तळांवर मोठा हल्ला केला होता. कतारमध्ये मध्य पूर्वेतील अमेरिकेचं सर्वात मोठं लष्करी तळ आहे. मात्र, याच ठिकाणी इराणने आता क्षेपणास्त्रे डागले होते.