इराकच्या अल कुट या शहरातल्या एका शॉपिंग मॉलला लागलेल्या आगीत ६० जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर ११ जण अद्याप बेपत्ता आहेत आणि त्यांचा शोध घेतला जातो आहे. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार आगीवर नियंत्रण आणण्यासाठी अजूनही प्रयत्न सुरु आहेत. पाच मजल्यांच्या या मॉलला आग लागल्याचं व्हायरल व्हिडीओंमध्ये दिसतं आहे.
सोशल मीडियावर इराकच्या आगीचे व्हिडीओ व्हायरल
सोशल मीडियावर इराकमधल्या शॉपिंग मॉलला लागलेल्या आगीचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. पाच मजली इमारतीला आग लागली असून या ठिकाणी आगीचे बंब आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. रॉयटर्सच्या वृ्त्तानुसार ६० जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. ६० पैकी ५९ मृतदेहांची ओळख पटली आहे. एका मृतदेहाचा अक्षरशः कोळसा झाला आहे त्यामुळे या मृतदेहाची ओळख पटलेली नाही.
इराकच्या आगीबाबतच्या ठळक घडामोडी
इराकच्या अल-कुट या शहरातील मॉलला भीषण आग लागली. या आगीत ६० जणांचा मृत्यू.
इराकच्या या मॉलला आग कुठल्या कारणांमुळे लागली हे अजून स्पष्ट झालेलं नाही. ४८ तासांत तपासाचे निष्कर्ष जाहीर केले जाण्याची चिन्हं आहेत.
मॉलच्या मालकाविरोधात आणि अग्नि सुरक्षा यंत्रणांविरोधात कायदेशीर कारवाई सुरु करण्यात आली आहे.
घटनास्थळी आगीचे लोळ आणि धुराचे लोट हे मोठ्या प्रमाणावर दिसत आहेत. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.
प्रत्यक्षदर्शींनी आगीबाबत काय सांगितलं?
या घटनेनंतर वासित प्रांत प्रशासनाने तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार मॉलला आग लागल्यानंतर आरडाओरडा आणि किंकाळ्या यांचे आवाज येत होते. तसंच आगीच्या भीतीने अनेक लोक सैरावैरा पळत होते. या आगीत ६० जणांचा मृत्यू झाला आहे.