उत्तर इराकमध्ये आत्मघातकी हल्लेखोरांनी केलेल्या बाँबहल्ल्यात किमान १२ जण ठार झाले तर देशातील अन्य भागांमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराने १३ जणांचा बळी घेतला आहे. इराकमधील जनतेमध्ये वाढता असंतोष पसरत चालला असून देशाचे पंतप्रधान नुरी अल मलिकी यांनी सांप्रदायिकतेमुळे हिंसाचार बळावत असल्याचा आरोप केला.
गुरुवारी झालेल्या हिंसाचारात बळी पडलेल्या शिया पंथीयांचे नातेवाईक शुक्रवारी शोकसभेसाठी येथील अल झहरा हुसैनीय्या येथे गोळा झाले होते. या स्थळी घुसण्याचा प्रयत्न आत्मघातकी हल्लेखोराने केला. मात्र पोलिसांनी त्याला अडविले. त्यामुळे प्रवेशद्वारावरच त्याने स्फोट घडवून आणला. या स्फोटात १२ जण मृत्युमुखी पडले व ४० जण जखमी झाले. गुरुवारच्या हिंसाचारातील बळींची संख्या १० होती.
इराकमध्ये मुळातच असलेला सांप्रदायिक तणाव शिया आणि सुन्नी पंथीयांच्या प्रार्थनास्थळावर सातत्याने होणाऱ्या हल्ल्यामुळे वाढू लागला आहे आणि त्यातच हिंसाचाराच्या घटनांची भर पडली आहे.
उत्तर इराकमध्येच अन्य एका आत्मघातकी हल्ल्यात दोन सैनिक ठार झाले तर एका कार बाँबस्फोटात दोघा पोलिसांसह ५ जणांचा मृत्यू झाला.
गेल्या तीन दिवसांमध्ये इराकमध्ये बळावलेल्या हिंसाचारातील मृतांची संख्या ७५ वर पोहोचली असून गेल्या महिन्याभरात या सांप्रदायिक हिंसाचारमुळे १८९ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. इराकचे पंतप्रधान मल्लिकी यांनी मात्र या हिंसाचाराचे खापर देशातील शिया आणि सुन्नी यांच्यातील ताणल्या गेलेल्या संबंधांवर फोडले आहे.