IRCTC Railway Ticket Online Booking: तुमच्या ऑनलाईन तिकीट बुकिंगच्या मध्ये ब्रह्मोस, टेस्ला आणि अॅव्हेंजर्स येत असल्याचं जर कुणी सांगितलं तर तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही. पण यासंदर्भातला मोठा गैरव्यवहार नुकताच समोर आला असून एकीकडे तुम्हाला ऑनलाईन रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये बराच काळ तिष्ठत बसावं लागत असताना आणि त्यानंतरदेखील कन्फर्म तिकीट मिळण्याची खात्री नसताना दुसरीकडे या यंत्रणा बिनदिक्कतपणे अवघ्या काही सेकंदांमध्ये कन्फर्म तिकीट घेऊन जात आहेत. यामधला मोठा गैरप्रकार नुकताच उघड झाला आहे. यातून भारतीय रेल्वेच्या ऑनलाईन तिकीट बुकिंग प्रणालीतील मोठ्या त्रुटी अधोरेखित झाल्या आहेत.
रेल्वे ऑनलाईन बुकिंगचा काय आहे घोटाळा?
इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार, यासाठी विशिष्ट प्रकारची यंत्रणा तयार करण्यात आली असून त्यामाध्यमातून अगदी काही सेकंदांमध्ये कन्फर्म तिकीट काढलं जात आहे. परिणामी मोठ्या संख्येनं सामान्य प्रवासी कन्फर्म तिकिटापासून वंचित राहात आहेत. यासाठी सॉफ्टवेअर प्रोग्रॅम्स तयार करण्यात आले आहेत. त्यांना ‘ब्रह्मोस’, ‘टेस्ला’, ‘अॅव्हेंजर्स’ अशी नावं या सॉफ्टवेअर प्रोग्रॅम्सला देण्यात आली आहेत.
ब्रह्मोस, टेस्ला, अॅव्हेंजर्स कसे काम करतात?
ही व्यवस्था नेमकी कशी काम करते? यासंदर्भात एका अधिकाऱ्याने इंडियन एक्स्प्रेसला माहिती दिली आहे. सामान्यपणे जनरल श्रेणीचं तिकीट प्रवासाच्या ६० दिवस आधी सुरू होतं. सकाळी ८ वाजता बुकिंगसाठी ही तिकिटं उपलब्ध केली जातात. पण बऱ्याचदा पुढच्या काही मिनिटांत ही तिकिटं संपलेली असतात आणि सामान्य प्रवाशांना वेटिंग लिस्ट दाखवली जाते. मग अवघ्या काही मिनिटांत ही तिकिटं संपतात कशी? असा प्रश्न प्रवाशांना पडतो. त्यामागे हेच ब्रह्मोस, टेस्ला आणि अॅव्हेंजर्स आहेत!
या प्रणालींमध्ये प्रवाशाचं नाव, वय या बाबी आधीच नोंद करून ठेवलेल्या असतात. त्यांचं कोडिंगही आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावरील कोडनुसार करण्यात आलेलं असतं. सकाळी ८ वाजता ऑनलाईन बुकिंग सुरू होण्याच्या आधीच ही प्रणाली कार्यरत झालेली असते. जिथे सामान्य प्रवाशांना बुकिंग करताना आधी नाव, वय, प्रवासाची माहिती अशा गोष्टी एकानंतर एक भराव्या लागतात, मग ओटीपी, कॅप्चा कोड भरणे अशा प्रक्रिया एकानंतर एक पार पाडाव्या लागतात, तिथे या प्रणालीच्या माध्यमातून एकाच वेळी या सगळ्या प्रक्रिया अगदी काही सेकंदांमध्ये पूर्ण होतात आणि १५ सेकंदांच्या आत तिकीट बुकदेखील होतं!
तिकीट बुकिंसाठी एक नव्हे, अनेक प्रणाली!
दरम्यान, रेल्वेचे मुंबईतील वरीष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ऋषी शुक्ला यांना यासंदर्भात विचारलं असता त्यांनी RPF अशा गोष्टींकडे लक्ष ठेवून असल्याचं सांगितलं. “आरपीएफ सातत्याने अशा प्रकारच्या प्रणालींवर लक्ष ठेवून असतं. या प्रकरणात आत्तापर्यंत आरपीएफनं अनेकांवर अटकेची कारवाईही केली आहे”, असं ते म्हणाले.
वास्तविक नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात NPCI च्या नियमानुसार ग्राहकाच्या मोबाईलवर पाठवलेले ओटीपी कोणत्याही प्रणालीकडून परस्पर वाचले जाऊ शकत नाहीत किंवा कॅप्चा कोडदेखील अशा कोणत्या प्रणालीकडून गैरप्रकार केले जाऊ नये म्हणूनच बनवले जातात. पण काही अवैध प्रणाली या सुरक्षा यंत्रणा पार करण्यात यशस्वी होत आहेत. प्रतिमहिना फक्त १५०० ते २५०० रुपये शुल्काच्या मोबदल्यात हे सॉफ्टवेअर्स संबंधित कंपन्या विकत आहेत. यात तिकीट बुकिंगची कोणतीही मर्यादा घालण्यात आलेली नाही. यातल्याच ब्रह्मोस यंत्रणेवर प्रती पीएनआर ९९ रुपये शुल्क आकारलं जातं.
प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा शुल्क आकारणी!
दरम्यान, अशा प्रणालीच्या माध्यमातून प्रवाशांना तिकिटं उपलब्ध करून देताना संबंधितांकडून अव्वाच्या सव्वा शुल्कआकारणी केली जात असल्याचंही समोर आलं आहे. स्लीपर कोचच्या एका तिकिटाची किंमत ८०० रुपये असल्यास त्याची प्रवाशांना विक्री २००० रुपयांना केली जात आहे. या किमती सण-उत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणावर वाढतात. विशेषत: उत्तर प्रदेश व बिहारकडे जाणाऱ्या रेल्वेच्या तिकिटांचे दर वाढलेले दिसतात. एखादं एसी कोचचं तिकीट २३०० रुपये असल्यास त्याची किंमत थेट ४ हजार रुपयांपर्यंत पोहोचते, अशी माहिती एका प्रशासकीय अधिकाऱ्याने इंडियन एक्स्प्रेसला दिली आहे.
Aadhaar Booking ID चीही काळ्या बाजारात विक्री!
अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने सकाळी ८ वाजल्यानंतर ३५ सेकंदांनंतरच कोणत्याही तिकिटीचं पेमेंट करण्यापासून ते अशा बुकिंगसाठी आधार आयडी पुरवणे सक्तीचे करण्यापर्यंत अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. पण त्यातूनही अशी फसवणूक करणाऱ्यांनी मार्ग काढला असून आधार बुकिंग आयडींची काळ्या बाजारात खरेदी-विक्री सुरू झाली आहे. बुकिंगसाठी वापरण्यासाठी या आयडीची खरेदी केली जात असून आधी त्याचे दर प्रतिआयडी ३० रुपये इतके होते, आता ते वाढून ५०० रुपयांपर्यंत गेल्याचं या अधिकाऱ्याने सांगितलं.
