विमा पॉलिसी घेताना एचआयव्ही निगेटिव्ह असलेल्या पॉलिसीधारकांचे एड्सबाधित झाल्यानंतर करण्यात येणारे विम्याचे दावे नाकारू नका, असे स्पष्ट निर्देश विमा नियामक विकास प्राधिकरणाने देशातील समस्त विमा कंपन्यांना दिले आहेत. त्याचबरोबर एड्सबाधित लोकांसाठी स्वतंत्र विमा उत्पादने देऊ करणारे मंडळ स्थापन करण्याचेही निर्देश एका पत्रकाद्वारे दिले आहेत.
एचआयव्हीबाधित झालेल्या विमा पॉलिसीधारकांचे विम्याचे दावे निकालात काढताना विमा पॉलिसी दिली तेव्हा लागू करण्यात आलेली मार्गदर्शक तत्त्वे पाळावीत, असेही विमा नियामक विकास प्राधिकरणाने पत्रकात नमूद केले आहे.
गंभीर आजारपण असलेल्या अशा विमाधारकांसाठी विमा कंपन्यांनी वेगळी विमा उत्पादने देऊ करावीत. १ एप्रिल २०१४ पासून या पत्रकातील निर्देश अमलात आणले जातील, असेही विमा प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे. त्यापूर्वी एड्सबाधित विमाधारकांसाठी स्वतंत्र विमा उत्पादने तयार करून त्यासाठी मंडळाची स्थापना संबंधित सर्व विमा कंपन्यांना करणे बंधनकारक ठरणार आहे, असेही विमा प्राधिकरणाने स्पष्ट
केले.