मेहसाणा : ‘‘गुजरात सरकार प्रेमविवाहांना पालकांची परवानगी अनिवार्य करणे घटनात्मकदृष्टय़ा शक्य आहे का हे तपासेल,’’ असे आश्वासन गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले. पाटीदार समाजाच्या विशिष्ट गटाकडून प्रेमविवाहांना पालकांची परवानगी अनिवार्य करण्याची मागणी होत आहे, त्याला उत्तर देताना पटेल यांनी ही माहिती दिली.

मेहसाणा येथे रविवारी पाटीदार समाजाची संघटना सरदार पटेल समूहातर्फे आयोजित कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री पटेल यांनी सांगितले, की राज्याचे आरोग्यमंत्री ऋषिकेश पटेल यांनी आपल्याला सुचवले, की विवाहासाठी मुली घरातून पळून जात असल्याच्या प्रकरणांचा अभ्यास करून, प्रेमविवाहांना संबंधितांच्या पालकांची परवानगी अनिवार्य करण्याची व्यवस्था करण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकेल. 

विरोधी पक्ष काँग्रेसचे आमदार इम्रान खेडावाला यांनी सांगितले, की  जर हा कायदा मंजूर करण्यासाठी विधानसभेत आला तर मी त्यासाठी सरकारला पाठिंबा देईन. गुजरात सरकारने २०२१ मध्ये गुजरात धर्म स्वातंत्र्य कायद्यात दुरुस्ती केली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.