Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंतप्रधान म्हणून तिसरी टर्म आहे. सप्टेंबर महिन्यात म्हणजेच पुढच्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी ७५ वर्षांचे होत आहेत. सरसंघचालक मोहन भागवत यांनी काही दिवसांपूर्वी पंचहात्तरीची शाल म्हणत एक उदाहरण देऊन विधान केलं होतं. त्याची चर्चाही रंगली होती. खासदार संजय राऊत यांनीही मोदी पंतप्रधान पद सोडतील असं भाष्य केलं होतं. दरम्यान भाजपात सद्यस्थिती काय आहे? तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उत्तराधिकारी शोधण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत का? याबाबत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक सुहास पळशीकर यांनी त्यांची मतं मांडली आहेत.
सुहास पळशीकर भाजपाच्या सद्यस्थितीबाबत काय म्हणाले?
कुठल्याही वर्चस्ववादी पक्षाच्या वाटचालीत काही टप्पे येतात. तुम्ही वर्चस्व निर्माण करता, ते प्रस्थापित करता त्यानंतर साहजिकच ज्या प्रक्रिया दाबलेल्या असतात त्या डोकं वर काढण्यास सुरुवात करतात आत्ता तसंच भाजपाचं होतं आहे. मोठा पाठिंबा त्यांना आहे. गेल्या निवडणुकीची आकडेवारी पाहिली तर दिसेल की मतांच्या बाबतीत त्यांची टक्केवारी खालावलेली नव्हती. पण गर्दी बरीच झाली, सगळ्या पक्षांतले लोक जातात कारण जे कुणी आहेत ते आता भाजपात जात आहेत. आपण रोज त्याबाबत बातम्या वाचतो. आता यांची व्यवस्था कशी लावायची? हे सगळे जात आहेत ते काही हिंदुत्वाने प्रेरित होऊन जात नाहीयेत. सगळ्यांना काहीतरी हवं आहे. ते मिळण्याची काय व्यवस्था हवी त्याचा विचार अद्याप भाजपाने पक्ष म्हणून केलेला नाही. पक्ष वाढला पण नियंत्रणाच्या व्यवस्थेचं केंद्र एकच आहे. एकच केंद्र असण्याचे जसे फायदे असतात तशा त्याच्या मर्यादाही असतात. बाकीच्यांच्या महत्वाकांक्षा हातात ठेवाव्या लागतात आणि त्या कधीतरी हाताबाहेर जाण्याची सुरुवात होते. त्यामुळे एका बाजूला कार्यकर्त्यांचं दडपण, दुसऱ्या बाजूला महत्त्वाकांक्षी नेत्यांचं दडपण आणि संघ आणि भाजपा यांच्यातला तणाव अशा परिस्थितीतून भाजपाची वाटचाल आत्ता चालली आहे असं राजकीय विश्लेषक सुहास पळशीकर यांनी म्हटलं आहे.
नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी शोधण्याची तयारी भाजपात सुरु झाली आहे का?
सर्व सत्ताकेंद्र एकाच व्यक्तीकडे असणं पाहिलं, आता पुढचा संघर्ष हा नरेंद्र मोदींचा राजकीय वारस कोण? यावर होणार का? त्याची सुरुवात झाली आहे का? असं विचारलं असता सुहास पळशीकर म्हणाले, “मी म्हणतो हा संघर्ष वाटेकरी कोण असा असेल. वारस कोण ही चर्चा नेहमी चालत असते. पंडित नेहरुंच्या काळातही ती चर्चा चालायची. आत्ताही या चर्चा सुरु आहेत. मात्र मोदींची आत्ताची एकूण उमेद पाहता, त्यांचा वारस शोधायची आत्ता गरज नाही. नेहरुंच्या बाबतीत वारस कोण ही चर्चा सुरु झाली कारण त्यांच्या तिसऱ्या कालखंडात त्यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे मोदींचा वारस कोण हा मुद्दा आत्ता चर्चेत नाही. पण वारस कोण असेल? शिवाय ज्यांना ते वारस नको आहेत ते त्यांचे पाय कापण्यासाठी काय करणार? म्हणजे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री मोठे होऊ नयेत म्हणून काय करायचं? पण त्यामुळे उत्तर प्रदेशचे खासदार कमी झाले आहेत. त्यामुळे एक प्रकारच्या गुंत्यामध्ये भाजपा अडकली आहे.” असं सुहास पळशीकर म्हणाले
ज्या पक्षाने सत्ता फारशी वाटलेली नाही अशा पक्षात…
पुढे पळशीकर म्हणाले, “ज्या पक्षाने आपसात सत्ता फारशी वाटलेली नाही त्या पक्षात पुढच्या वारसांचे आणि वाटेकरींचे प्रश्न येतात तेव्हा ते फार कट्टर आणि तीव्र संघर्षाचे असतात. भारतात मागे इतिहासात जाऊन ते सापडणं फार अवघड आहे. याचं कारण नेहरुंच्या काळात बऱ्यापैकी शक्तीशाली मुख्यमंत्री आणि मंत्री होते. कामराज योजनेसारखी योजना आणून त्यामध्ये घुसळण करण्याचा प्रयत्नही पंडित नेहरुंनी केला होता.” असं मत सुहास पळशीकर यांनी मांडलं. सुहास पळशीकर यांनी थिंक बँकला दिलेल्या मुलाखतीत हे भाष्य केलं आहे.
मोदींवर पुढची जबाबदारी काय?
यानंतर पळशीकर म्हणाले, “मोदी आता कुठली योजना आणतात? हे बघावं लागेल, कुणाला कुठे बसवतात आणि कशा प्रकारे पुढची व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. देशावर दहा वर्षे राज्य करणाऱ्या नेत्याची ही जबाबदारी राहते की इथून पुढच्या काळात काहीतरी व्यवस्था लावून देणं. मोदी ती व्यवस्था कशी लावतात हे पाहणं रोचक ठरणार आहे. पण तुम्ही भाजपातले असाल तर ते अत्यंत कर्कश किंवा क्रूर असणार आहे. एकमेकांचे काटे काढणं अशा पद्धतीचं असणार आहे.” असं मत थिंक बँक या कार्यक्रमात सुहास पळशीकर यांनी मांडलं.