Bengaluru Central Jail Viral Video Case : सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी चित्रपट अभिनेता दर्शन थुगुदीपा याला बंगळुरू येथील परप्पना अग्रहारा मध्यवर्ती कारागृहात विशेष वागणूक मिळत असल्याबद्दल इशारा दिला होता. त्यानंतर आता पुन्हा एखादा शनिवारी नवीन व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये हाय-सेक्युरिटी कैदी ज्यामध्ये एका सीरियल रेपीस्टबरोब दहशतवादाचे आरोप असलेला कैदीही तुरूंगात उघडपणे स्मार्टफोन वापरताना दिसून येत आहेत.
असे किमान सहा व्हिडीओ समोर आले आहेत, ज्यामध्ये कैदी हे स्मार्टफोन्स वापरताना, टीव्ही पाहताना आणि तुरूंगात मोकळेपणाने फिरताना पाहायला मिळत आहेत. एका व्हिडीओमध्ये सीरियल रेपिस्ट आणि खुनी उमेश रेड्डी, ज्याच्यावर १९९६ आणि २०२२ च्या कालखंडात २० बलात्कार आणि हत्येचे गुन्हे दाखल आहेत, तो त्याच्या कोठडीत टीव्हीच्या शेजारी बसून स्मार्टफोनवर बोलत असल्याचे पाहायला मिळत आहे.
दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये दहशतवादी संघटना ISIS साठी भरती केल्याचा आरोप असलेला जुहाद हमीद शकील मन्ना हा इतर कैद्यांबरोबर एक स्मार्टफोन आणि एक बेसिक हँडसेट असे दोन्ही वापरताना दिसत आहे. द इंडियन एक्सप्रेसने यासंबंधिचे वृत्त दिले आहे.
तुरूंगाचे अतिरिक्त इन्स्पेक्टर जनरल पी. व्ही. रेड्डी म्हणाले की हे व्हिडीओ २०२३ आणि २०२४ चे आहेत. “हे मोबाईल फोन तुरूंगात कसे गेले आणि ते कोणी पुरवले, हे व्हिडिओ कधी रेकॉर्ड केले गेले आणि कोणी ते इलेक्ट्रॉनिक माध्यमांना दिले, याबाबत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत,” असे ते एका निवेदनात म्हणाले.
हे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामया म्हणाले की, ते याचा सविस्तर अहवाल मागवतील आणि सुरक्षा व्यवस्थेतीत त्रुटींसाठी जबाबदार असलेल्यांविरोधात कारवाई सुरू करतील.
पराप्पना अग्रहारा सेंट्रल जेलध्ये अनेक हाय-रिस्क कैदी आहेत, आणि यापूर्वीही त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. ऑक्टोबर महिन्यात एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये एक कुख्यात गँगस्टर श्रीनिवास ज्याला गुब्बाची सीना म्हणून देखील ओळखले जाते, हा तुरूंगात त्याचा वाढदिवस साजरा करत होता.
या सेलिब्रेशनमध्ये केक आणि फुलांचा हार देखील पाहायला मिळाला, इतकेच नाही तर सीा हा मोठ्या चाकून केक कापत होता. कथितपणे एका कैद्याने हा फोनवर या पार्टीचा व्हिडीओ रेकॉर्ड केला आणि नंतर तो ऑनलाईन शेअर केला. तपासात चार ते पाच महिन्यापूर्वी हा प्रकार घडल्याचे उघडकीस आले.
गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात एक फोटो व्हायरल झाला होता, ज्यामध्ये बंगळुरूच्या सेंट्रल जेलमधून दर्शन हा गँगस्टर जे नागराज उर्फ विल्सन गार्डनर नागा याच्याबरोबर बसून सिगारेट ओढत फोनवर बोलत असल्याचे दिसून आले होते. या ऑगस्टमध्ये, दर्शनचा जामीन रद्द करताना सर्वोच्च न्यायालयाने कारागृह विभागाला नियमांचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेण्यास सांगितले होते.
