Illegal religious conversion racket उत्तर प्रदेश पोलिसांनी शनिवारी बेकायदा धर्मांतर करणाऱ्या एका रॅकेटचा पर्दाफाश केला. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे रॅकेट आयसिस पद्धतीने काम करत होते. या कारवाईत सहा वेगवेगळ्या राज्यांमधून १० जणांना अटक करण्यात आली आहे. मार्चमध्ये ३३ आणि १८ वर्षांच्या दोन बहिणी बेपत्ता झाल्याची तक्रार आग्रामध्ये नोंदवण्यात आल्यानंतर हा तपास सुरू झाला. या तपासात पोलिसांना असे आढळून आले की, बेपत्ता झालेल्या दोन बहिणींना धर्म बदलण्यास भाग पाडण्यात आले होते.
धर्मांतर रॅकेटवर पोलिसांची कारवाई
आग्राचे पोलीस आयुक्त दीपक कुमार यांच्या म्हणण्यानुसार, बेपत्ता झालेल्या एका मुलीने सोशल मीडियावर एक प्रोफाइल फोटो लावला होता, त्यामध्ये एका मुलीच्या हातात एके-४७ रायफल होती. त्यानंतर पोलिसांच्या तपासाला वेग आला. दिपक कुमार म्हणाले, “प्राथमिक तपासात असे आढळून आले की या बहिणींना ‘लव्ह जिहाद’ आणि कट्टरतावादात सहभागी असलेल्या टोळीने लक्ष्य केले होते.”
पोलीस आयुक्त दीपक कुमार यांचा असाही दावा आहे की, या रॅकेटला अमेरिका आणि कॅनडासह विदेशातून निधी मिळत होता. “आम्हाला अमेरिका आणि कॅनडामधून या रॅकेटला निधी मिळत असल्याचे पुरावे मिळाले आहेत,” असे ते म्हणाले. अटक केलेल्या व्यक्तींनी नेटवर्कमध्ये विविध भूमिका बजावल्याचा संशय आहे. बेकायदा पद्धतीने निधी मिळवणे, आश्रय देणे, धर्मांतर आणि कट्टरतावाद प्रक्रियेला चालना देणे, अशा अनेक गैरकामांमध्ये अटक करण्यात आलेल्या व्यक्तींचा समावेश होता.
“ही टोळी आयसिस पद्धतीने धर्मांतर करत असल्याचे तपासात दिसून आले आहे,” असे आयुक्त कुमार म्हणाले. अटक केलेल्या १० व्यक्तींमध्ये एका महिलेचा समावेश आहे. राजस्थानमधील तीन, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी दोन आणि दिल्ली, उत्तराखंड आणि गोव्यातील प्रत्येकी एकाला अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या व्यक्तींची ओळख पटली आहे. गोव्यातील आयशा (उर्फ एस.बी. कृष्णा), कोलकातामधील अब्बू तालिब खलापर, देहरादूनमधील अबुर रहमान देहरादून, दिल्लीतील मुस्तफा (उर्फ मनोज)आणि जयपूरमधील मोहम्मद अली आणि जुनैद कुरेशी अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
‘मिशन अस्मिता’ अंतर्गत कारवाई
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता उत्तरप्रदेश पोलिसांनी चालू तपासात मदत करण्यासाठी विशेष कार्य दल (एसटीएफ) आणि दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) यांसारख्या विशेष तुकड्या तैनात केल्या आहेत. योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकारने सुरु केलेल्या ‘मिशन अस्मिता’ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. बेकायदा धर्मांतर, कट्टरतावाद, लव्ह जिहाद आणि राष्ट्रीय सुरक्षेला हाणी पोहोचवण्यासाठी परकीय निधीतून होणाऱ्या प्रयत्नांना आळा घालण्यासाठी सरकारने हा उपक्रम सुरु केला आहे.
उत्तर प्रदेशचे पोलीस महासंचालक राजीव कृष्णा म्हणाले की, पोलीस या नेटवर्कच्या विस्ताराबाबत इतर राज्य आणि केंद्रीय यंत्रणांशी समन्वय साधत आहेत. पोलीस पुढील चौकशीसाठी आरोपींना कोठडीत ठेवण्याची मागणी करतील, असेही त्यांनी सांगितले.