वृत्तसंस्था, ढाका

चिन्मय कृष्णा दास ब्रह्मचारी या हिंदू नेत्याला सोमवारी झालेली अटक आणि त्यापाठोपाठचा तुरुंगवास यामुळे भारताकडून अधिकृतरीत्या चिंता व्यक्त करण्यात आली असतानाच, चिन्मय दास यांच्या कारवायांशी इस्कॉनचा काहीही संबंध नाही असा खुलासा ‘इस्कॉन बांगलादेश’चे सरचिटणीस चारू चंद्र दास ब्रह्मचारी यांनी केल्याचे वृत्त ‘ढाका ट्रिब्युन’ने केला आहे.

बांगलादेशच्या उच्च न्यायालयाने ‘इस्कॉन बांगलादेश’वर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका फेटाळल्यानंतर चारू दास यांनी यासंबंधी आपली भूमिका स्पष्ट केली. चिन्मय दास यांची कृत्ये आमच्या संघटनेचे प्रतिनिधित्व करत नाहीत, असे सांगत चारू दास यांनी चिन्मय दास यांच्यापासून अंतर राखले. चिन्मय दास यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई म्हणून त्यांना यापूर्वीच संघटनेच्या सर्व पदांवरून काढून टाकण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या कृतींमध्ये इस्कॉनचा सहभाग नसतो असे चारू दास म्हणाले.

हेही वाचा >>>ऑस्ट्रेलियात मुलांना समाजमाध्यमबंदी; नव्या कायद्यात नियमभंग करणाऱ्या कंपन्यांना मोठ्या दंडाची तरतूद

बांगलादेशात या आठवड्यात घडलेल्या हिंसक कारवायांशी इस्कॉनचा संबंध नाही, असेही चारू दास यांनी स्पष्ट केले. इस्कॉन बांगलादेश कधीही धर्मांध किंवा संघर्षावर आधारित कृत्यांमध्ये सहभागी नव्हता आणि आम्ही केवळ ऐक्य व सलोख्याचा प्रचार करतो असे ते म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हिंदूंना एकत्र केल्यामुळे आम्ही लक्ष्य!

दुसरीकडे, इस्कॉन बांगलादेश हिंदूंना एकत्र करत असल्याबद्दल आणि जबरदस्तीच्या धर्मांतरांना विरोध केल्यामुळे आम्हाला लक्ष्य केले जात असल्याचा आरोप चारू दास यांनी ‘पीटीआय’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये केला आहे. आमच्या कामामुळे बांगलादेशातील मूलतत्त्ववादी आमची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करत असल्याचे दास म्हणाले.