दहशतवादी संघटना ISIS चा म्होरक्या अबू बक्र अल-बगदादी याच्याविरोधात अमेरिकेने चालवलेल्या मोहिमेत बगदादीचा खात्मा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बगदादीला अमेरिकेच्या सैन्याने लक्ष्य केल्याची माहिती आहे. दरम्यान, “थोड्यावेळापूर्वीच काहीतरी खूप मोठं घडलंय”, असं ट्विट डोनाल्ड ट्रम्प यांनी केल्यामुळे जगभरात विविध चर्चांना उधाण आला असून ट्रम्प काय घोषणा करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्यांच्या ट्विटनंतर विविध शक्यता वर्तवल्या जात आहेत.

अमेरिकेच्या सैन्य दलाने शनिवारी वायव्य सिरियात झालेल्या हल्ल्यात बगदादीला लक्ष्य केल्याचं वृत्त सीएनएनने दिलं आहे. अमेरिकेच्या सैन्याने  ISIS च्या तळांवर हल्ला केला, त्यावेळी बगदादीवर निशाणा साधण्यात आला. अमेरिकेच्या वरिष्ठ संरक्षण अधिकाऱ्याचा हवाल्याने सीएनएनने हे वृत्त दिलंय. याबाबत डोनाल्ड ट्रम्प थोड्याचवेळात घोषणा करणार असल्याचंही सांगितलं जात आहे. वृत्तसंस्था reuters नेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तर, अमेरिकेने  बगदादीचा खात्मा करण्यासाठी मोठी मोहीम हाती घेतली आहे, असं वृत्त रॉयटर्सच्या हवाल्यानं एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे. त्यातच अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘काही तरी मोठं घडलंय’ असं ट्विट केल्यानं बगदादी मारला गेल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, अद्याप बगदादी संबंधित सविस्तर माहिती मिळू शकलेली नाही. ट्रम्प पत्रकार परिषद घेऊन मोठी घोषणा करतील अशी माहिती व्हाइट हाऊसमधून देण्यात आली आहे.

गेल्या पाच वर्षांपासून लपून असलेला बगदादी हा अनेकदा हल्ल्यांमध्ये ठार झाल्याचे रिपोर्ट्स यापूर्वी आले आहेत. दोन वर्षांपूर्वीही रशियाच्या सैन्याने बगदादीचा खात्मा केल्याचा दावा केला होता. मात्र नंतर हा दावा खोटा ठरला.