गाझा येथे युद्धविराम व्हावा, यासाठी शांतता प्रस्तावाच्या पहिल्या टप्प्याला इस्रायल आणि हमासने मंजुरी दिली आहे. यामुळे या ठिकाणी दोन वर्षांपासून सुरू असलेला रक्तरंजित संघर्ष थांबणार आहे. हमासच्या ताब्यात असलेले इस्रायलचे उर्वरित ओलीस आणि इस्रायलच्या ताब्यात असलेल्या पॅलेस्टिनी कैद्यांचे आदानप्रदान होणार आहे. इस्रायल-हमासमधील या घडामोडीचे जगभरात स्वागत होत आहे. अर्जेंटिना, मलेशिया, जपान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडसह जगभरातून शांततेचे संदेश दिले जात आहेत. भारतानेही या कराराचे स्वागत केले आहे.
सूत्रांनी सांगितले, की या करारानुसार हमास त्यांच्याकडील २० ओलिसांची सुटका काही दिवसांत करील, तर इस्रायलचे लष्कर गाझातील बहुतांश भागातून माघार घेण्यास सुरुवात करणार आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आठवड्याभरापूर्वी २० कलमी शांततेचा प्रस्ताव ठेवला होता. गाझा येथे तातडीने युद्धविराम लागू होण्याबरोबरच ओलिसांच्या सुटकेची त्यात अट होती. हा प्रस्ताव इस्रायलने मान्य केला होता. त्यानंतर इजिप्तमध्ये शर्म अल शेख येथे इस्रायल आणि हमास यांच्यात चर्चा सुरू होती.
युद्धविरामाच्या पहिल्या टप्प्याला इस्रायल-हमासने मंजुरी दिली असली, तरी ट्रम्प यांच्या प्रस्तावातील सर्व अटी हमासला मान्य नाहीत. त्यामुळे युद्धविराम हा पहिला टप्प्यापुरताच मर्यादित राहील, की दीर्घ काळासाठी शांततेचे पाऊल पडेल, हे पुढील काळातच स्पष्ट होणार आहे. हमासने निःशस्त्र होऊन गाझावरील प्रशासनात कुठलाही भाग घेऊ नये, ही अट हमासला मान्य होण्याची शक्यता नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
पहिल्या टप्प्याला मंजुरी, स्वाक्षरीची प्रतीक्षा
७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमासने इस्रायलवर हल्ला केला होता. त्यात सुमारे १२०० जण ठार झाले होते. हमासने अडीचशे इस्रायलींना पळवून आणून ओलीस ठेवले होते. तेव्हापासून या ठिकाणी युद्ध सुरू आहे. हजारोंचा बळी यात गेला आहे. युद्धविरामाच्या पहिल्या टप्प्याला दोन्ही बाजूंनी मंजुरी दिली असली, तरी प्रत्यक्ष स्वाक्षऱ्या होणे अद्याप बाकी आहे. इस्रायलने तोपर्यंत गाझामध्ये हल्ले सुरूच ठेवले आहेत. युद्धविरामाबाबत इस्रायली लष्कर तयारी करीत असल्याची प्रतिक्रिया इस्रायलने दिली आहे.
याचा (कराराचा) अर्थ म्हणजे, दीर्घकालीन शांततेसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांतील पहिल्या टप्प्यात सर्व ओलिसांची लवकरच सुटका होईल. उभयतांना मान्य असलेल्या सीमारेखेपर्यंत इस्रायल त्यांचे सैन्य माघारी घेईल. हमास साधारणतः सोमवारपासून ओलिसांची मुक्तता करील. – डोनाल्ड ट्रम्प, अध्यक्ष, अमेरिका
ईश्वर कृपेने त्या सर्वांना (ओलिसांना) आम्ही पुन्हा घरी आणू. हा करार मंजुरीसाठी सरकारसमोर ठेवला जाईल. – बिन्यामिन नेतान्याहू, पंतप्रधान, इस्रायल
अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्या शांततेच्या प्रस्तावाच्या पहिल्या टप्प्याच्या मंजुरीचे आम्ही स्वागत करतो. पंतप्रधान नेतान्याहू यांच्या कणखर नेतृत्वही यातून प्रतिबिंबित होते. ओलिसांची सुटका आणि गाझातील नागरिकांना तातडीने मानवी मदत मिळावी आणि दीर्घ काळासाठी शांततेचा मार्ग प्रस्थापित व्हावा. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान
कराराच्या पूर्ण अंमलबजावणी संयुक्त राष्ट्रसंघाचा पाठिंबा असेल. मानवी मदतही या ठिकाणी वाढविली जाईल. गाझाच्या पुन्हा बांधणीसाठी प्रयत्न केले जातील. – अँटोनिओ गुटेरस, सरचिटणीस, संयुक्त राष्ट्रसंघ
वर्षानुवर्षांच्या वेदनादायी काळानंतर शांतता दृष्टिपथात आली आहे. ओलीस लवकरच त्यांच्या कुटुंबीयांबरोबर एकत्र येतील. – मार्क कार्नी, पंतप्रधान, कॅनडा