Benjamin Netanyahu On Qatar: कतारची राजधानी दोहा येथे इस्रायली लष्कराने काही दिवसांपूर्वी हल्ला केला होता. हमासच्या नेतृत्वाला लक्ष्य करण्यासाठी हा हवाई हल्ला केल्याचं इस्रायली सैन्यांनी सांगितलं होतं. मात्र, या हल्ल्यानंतर कतारने आक्रमक भूमिका घेतली होती आणि कतार- इस्रायल यांच्यातील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं होतं.
इस्रायलच्या हल्ल्यानंतर कतार चांगलाच अॅक्शन मोडवर आला होता. यातच कतारमध्ये अमेरिकेचा लष्करी तळ असल्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरील मोठ्या घडामोडी पाहायला मिळाल्या. त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याबाबत इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती. आता बेंजामिन नेतान्याहू यांनी दोहा येथील हल्ल्याबाबत कतारची माफी मागितल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भातील वृत्त रॉयटर्सच्या हवाल्याने इंडिया टुडेनी दिलं आहे.
वृत्तानुसार, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमधून कतारच्या पंतप्रधानांना फोन करत माफी मागितली आहे. सोमवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची व्हाईट हाऊसमध्ये बेंजामिन नेतान्याहू यांनी भेट घेतली. या भेटी दरम्यान डोनाल्ड ट्रम्प आणि बेंजामिन नेतान्याहू यांच्यात बराच वेळ चर्चा झाली. त्यानंतर बेंजामिन नेतान्याहू यांनी कतारची माफी मागितल्याचं वृत्तात म्हटलं आहे.
या महिन्याच्या सुरुवातीला कतारच्या दोहामध्ये इस्रायलच्या सौन्यांनी हमासच्या वरिष्ठ नेत्यांना लक्ष्य करत हल्ला केला होता. या हल्ल्याबाबत आता बेंजामिन नेतान्याहू यांनी कतारची माफी मागितली आहे. इस्रायलने केलेल्या हल्ल्यात हमासचे वरिष्ठ अधिकारी खलील यांचा मुलगा आणि एक सहाय्यक जिहाद यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, या हल्ल्यात कतारच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन केल्याबद्दल नेतान्याहू यांनी माफी मागत हल्ल्यात कतारी सुरक्षा रक्षकाच्या मृत्यूबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.
दरम्यान, गाझामधील युद्ध संपवण्यासाठी आणि हमासने बंदी बनवलेल्यांना सोडण्यासाठी शांतता करार करण्यासाठी सध्या घडामोडी सुरू आहेत. या पार्श्वभूमीवरील कराराला अंतिम स्वरूप देण्यासाठी नेतान्याहू आणि ट्रम्प यांच्यात चर्चा सुरू आहेत.