इस्रायल व हमासमध्ये चार दिवसांची युद्धबंदी झाल्यामुळे गाझा पट्टीतील पॅलेस्टिनी नागरिकांनी काहीसा सुटकेचा निश्वास टाकल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, ही युद्धबंदी अल्पकालीन असल्याचं भानही गाझा पट्टीतल्या वातावरणा दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर इस्रायलनं नुकत्याच हल्ला करून उद्ध्वस्त केलेल्या आणि त्यासाठी जगभरातून त्यांच्यावर टीका झालेल्या गाझा पट्टीतील अल शिफा रुग्णालयाचा व्हिडीओ इस्रायल लष्करानं जारी केला आहे. या रुग्णालयाच्या खाली कशा प्रकारे हमासनं आपलं कमांड सेंटर तयार केलं होतं, याचा व्हिडीओमध्ये इस्रायलच्या लष्करी अधिकाऱ्यांनी उल्लेख केला आहे.
काय आहे व्हिडीओमध्ये?
इस्रायल लष्करानं गाझा पट्टीतील भुयारांची रचना दाखवणारे काही व्हिडीओ त्यांच्या अधिकृत एक्स (ट्विटर) हँडलवर शेअर केले आहेत. यामध्ये इस्रायलचे लष्करी अधिकारी या भुयारांची माहिती देत आहेत. या भुयारांमध्ये सुसज्ज यंत्रणा, वीजपुरवठा, वातानुकूलित यंत्रणा, झोपण्याच्या खोल्या, बैठकीची खोली, शौचालये अशी सर्व व्यवस्था असल्याचं या व्हिडीओमध्ये दाखवण्यात आलं आहे. विशेष म्हणजे इस्रायलनं हल्ला केलेल्या अल शिफा रुग्णालयाच्या खाली असणाऱ्या या भुयारांच्या जाळ्याचं एक टोक रुग्णालयाच्या नजीक असणाऱ्या एका निवासी घरात निघत असल्याचंही व्हिडीओच्या माध्यमातून दाखवण्यात आलं आहे.
“एवढा पुरावा तुमच्यासाठी पुरेसा आहे का?” अशी पोस्ट या व्हिडीओसोबत करण्यात आली आहे. शिवाय, “अल शिफा रुग्णालयाजवळच्या एका घरातही आम्हाला भुयाराचं तोंड सापडलं आहे”, अशीही पोस्ट करून एक व्हिडीओ त्यासोबत शेअर करण्यात आला आहे.
कशी आहे या भुयारांची रचना?
या भुयारांची साधारण उंची ६ ते साडेसहा फूट असून रुंदी तीन फूट असल्याचं दिसत आहे. अल शिफा रुग्णालयाच्या आवारातील एका भागात या भुयाराचं प्रवेशद्वार आहे. याच भुयारांमध्ये हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी हजारो पॅलेस्टिनी नागरिक आश्रयालाही राहिल्याचं इस्रायल लष्कराकडून सांगण्यात आलं आहे.
“हमासचे दहशतवादी या भुयारांचा वापर करूनच हल्ल्यापासून स्वत:चा बचाव करत आहेत. त्यांनी या रुग्णालयाचा वापर मानवी कवच म्हणून केला. या भुयारांमध्ये ते दीर्घकाळासाठी राहू शकत होते. इथल्या खोल्यांमध्ये वातानुकूलित यंत्रणाही लावण्यात आली आहे”, अशी माहिती हे भुयार शोधून काढणारे इस्रायली कमांडर एलाद त्सुरी यांनी व्हिडीओमध्ये दिली आहे.
हमासची आगपाखड
दरम्यान, इस्रायलयनं अल शिफावर हल्ला केल्यानंतर हमासकडून या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला आहे. “इस्रायलनं सांगितलेल्या गोष्टींवर अमेरिकेनं विश्वास ठेवला, अल शिफाचा लपण्यासाठी वापर केला जात असल्याच्या दाव्यावर विश्वास ठेवला. त्यामुळे इस्रायलला अधिक आक्रमकपणे गाझा पट्टीत विद्ध्वंस करण्याची मोकळीकच मिळाली”, अशी टीका हमासकडून करण्यात येत आहे. मात्र, “आता जगानं अल शिफा रुग्णालयात काय घडत होतं, यावर बोलायला हवं”, अशा शब्दांत इस्रायल लष्कराकडून अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.