वृत्तसंस्था, गाझा

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी इस्रायलला नव्याने शस्त्रविक्री करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर इस्रायलच्या गाझावरील हल्ल्याची तीव्रता वाढली आहे. इस्रायलने शुक्रवारी आणि शनिवारी २४ तासांच्या कालावधीत गाझापट्टीवर केलेल्या हल्ल्यामध्ये १६५ पॅलेस्टिनी ठार तर २५० जखमी झाले अशी माहिती गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने शनिवारी दिली.

इस्रायल आणि हमासदरम्यान सुरू असलेल्या युद्धामुळे या युद्धामुळे गाझापट्टीत सामान्य नागरिकांसमोर उद्भललेल्या युद्धबळी, भूक आणि विस्थापनाच्या अक्राळविक्राळ समस्या पाहता हे युद्ध थांबवावे यासाठी एकीकडे आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी इजिप्त, कतार आणि युरोपमधील देश सातत्याने चर्चा करत आहेत. तर दुसरीकडे, अमेरिकेने इस्रायलला लष्करी मदतीचा प्रस्ताव मंजूर केला आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन आणि संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांनीही युद्ध थांबवण्यासाठी चर्चामध्ये सहभाग घेतला आहे.

हेही वाचा >>>‘न्यूजक्लिक’ प्रकरणी गौतम नवलखांची चौकशी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इस्रायलच्या लढाऊ विमानांनी शुक्रवारी रात्रीनंतर मध्य गाझामधील नुसरैत आणि बुरैज या निर्वासितांच्या छावण्यांवर हवाई हल्ले केले. त्यामध्ये मोठय़ा प्रमाणात प्राणहानी झाल्याची माहिती आहे. इस्रायल आणि हमासदरम्यानच्या युद्धाने १२ आठवडे पूर्ण होत असताना, त्यामध्ये आतापर्यंत २१ हजार ६७२ पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला असून ५६ हजार १६५ जण जखमी झाले आहेत अशीही माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली. तसेच, २३ लाख लोकसंख्येपैकी जवळपास ८५ टक्के रहिवासी विस्थापित झाले आहेत.

अमेरिकेचा दुटप्पीपणा

बायडेन प्रशासनाने इस्रायलला तातडीने १४ कोटी ७५ लाख डॉलर किमतीच्या शस्त्रास्त्र विक्रीचा प्रस्ताव मंजूर केल्यामुळे अमेरिका खरोखर शस्त्रविराम घडवण्यासाठी गंभीर आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे. या महिन्यात अमेरिकी काँग्रेसला सहभागी करून न घेता बायडेन प्रशासनाने इस्रायलला लष्करी मदत केल्याचा हा दुसरा प्रसंग आहे.