Israel Strikes Iran Nuclear Sites: भारतानं पाकिस्तानमध्ये केलेल्या एअर स्ट्राईकची जगभर चर्चा होत असताना इस्रायलनं तशाच प्रकारचा हल्ला इराणमध्ये केला आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार शुक्रवारी पहाटेच्या सुमारास इराणच्या तेहरानमधील अनेक लष्करी तळांवर इस्रायलनं हवाई हल्ले केले. इराणमधील आण्विक तळांना प्रामुख्याने इस्रायलनं लक्ष्य केल्याचं सांगितलं जात आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी ‘ऑपरेशन रायजिंग लायन’ सुरू केल्याची घोषणा केली आहे. इस्रायलला असणारा धोका पूर्णपणे निपटून काढल्याशिवाय हे ऑपरेशन थांबणार नाही, असा निर्धार यांनी देशाला उद्देशून केलेल्या निवेदनात व्यक्त केला आहे.

बेंजामिन नेतन्याहूंनी जगाला दिली माहिती

दरम्यान, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी यासंदर्भात एका व्हिडीओच्या माध्यमातून निवेदन सादर केलं असून त्यात इराणवरील हल्ल्याबाबत माहिती दिली आहे. “काही वेळापूर्वीच इस्रायलनं ऑपरेशन रायजिंग लायन सुरू केलं आह. इस्रायलच्या अस्तित्वालाच धोका निर्माण करणाऱ्या इराणमधील संकटाला परतवून लावण्यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. जोपर्यंत इस्रायलवर आलेलं हे संकट पूर्णपणे निपटून काढलं जात नाही. तोपर्यंत हे ऑपरेशन चालूच राहील”, असं बेंजामिन नेतन्याहू यांनी या निवेदनात स्पष्ट केलं आहे.

आंतरराष्ट्रीय आण्विक ऊर्जा संस्थेचा दुजोरा

इस्रायलनं इराणच्या लष्करी व आण्विक तळांवर केलेल्या हवाई हल्ल्यांमध्य इराणच्या आण्विक ताकदीचं मोठं नुकसान झाल्याचं बोललं जात आहे. या नुकासानाला आंतरराष्ट्रीय आण्विक ऊर्जा आयोगानंही दुजोरा दिला आहे. त्यामुळे आता इराणकडून यासंदर्भात कोणतं पाऊल उचललं जातं? याकडे अवघ्या जगाचं लक्ष लागलं आहे.

हल्ल्यानंतर इराणची काय भूमिका?

दरम्यान, इस्रायलनं आण्विक तळांवर केलेल्या हल्ल्यांनंतर आता इराणकडून संतप्त प्रतिक्रिया आली आहे. या हल्ल्याला सडेतोड उत्तर दिलं जाईल, असं इराणनं म्हटलं आहे. इस्रायलनं हा हल्ला अमेरिकेच्या मदतीने घडवून आणल्याचा आरोप इराणनं केला आहे. इराणच्या लष्कराचे प्रवक्ते ब्रिगडियर जनरल अबुलफझल शेकरची यांनी इराणच्या राष्ट्रीय वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये भूमिका स्पष्ट केली आहे.

“इस्रायल व अमेरिकेला या हल्ल्याची जबरदस्त किंमत मोजावी लागेल”, असा थेट इशारा शेकरची यांनी दिला आहे. इस्रायलकडून हल्ल्यासंदर्भात अमेरिकेला कल्पना दिली होती, अशी माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे आता इस्रायल विरुद्ध इराण यांच्या थेट संघर्षात अमेरिकाही ओढली गेल्याचं सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवर इराणकडून इस्रायलबरोबरच अमेरिकेविरोधातही पावलं उचलली जाणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

इराणमधील भारतीय नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना

दरम्यान, इस्रायलच्या हल्ल्यानंतर भारत सरकारनं इस्रायलमध्ये राहणाऱ्या भारतीयांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. तिथल्या भारतीय दूतावासामार्फत या सूचना देण्यात आल्या आहेत. “सध्याच्या तणावपूर्ण परिस्थितीमध्ये इस्रायलमध्ये राहणाऱ्या सर्व भारतीयांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. सर्वांनी इस्रायल प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या सुरक्षाविषयक नियमांचं पालन करावं. आवश्यकता नसेल तर देशांतर्गत प्रवास टाळावा व सेफटी शेल्टर्सच्या जवळ राहावं”, असे निर्देश इस्रायलमधील भारतीयांना देण्यात आले आहेत.

इस्रायल युद्ध सुरू होणार?

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून इराण व इस्रायलमध्ये एकमेकांना उद्देशून इशारे दिले जात होते. काही प्रमाणात लष्करी कारवायाही झाल्याचं दिसून आलं. मात्र, आता इस्रायलनं थेट इराणच्या भूमीवर हवाई हल्ले केले आहेत. त्यात इराणच्या लष्करी व आण्विक तळांनाही इस्रायलनं लक्ष्य केलं आहे. त्यामुळे आता इराणकडून त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं जाण्याची शक्यता आहे. यात इराणनं अमेरिकेलाही आव्हान दिल्यामुळे या देशांमध्ये युद्ध भडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

IRGC कमांडर होसेन सलामी ठार

इस्रायनलं इराणच्या हद्दीतील वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये ITGC अर्थात इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सचे कमांडर इन चीफ जनरल होसेन सलामी ठार झाल्याचं वृत्त इराणमधील अनेक सरकारी माध्यमांनी दिलं आहे. त्यामुळे इराणच्या लष्करी कारवायांना हा मोठा धक्का मानला जात आहे.