दुबई : इराणने अणू कार्यक्रम पुढे नेण्याची कटिबद्धता वारंवार दर्शविल्यानंतर आणि या बाबतीत अमेरिकेच्या आवाहनालाही धुडकावून लावल्यानंतर इस्रायलने शुक्रवारी इराणच्या आण्विक आणि क्षेपणास्त्र तळांना लक्ष्य केले. इस्रायलच्या ‘ऑपरेशन रायझिंग लायन’मध्ये इराणच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. इराणने या हल्ल्याला ड्रोन हल्ल्याने तातडीने प्रत्युत्तर दिले आहे. इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांनी इस्रायलला धडा शिकवला जाईल, असा इशारा दिला आहे.

इराकबरोबर १९८०च्या दशकात झालेल्या युद्धानंतर इराणवर झालेला हा पहिलाच मोठा हल्ला आहे. इराणकडून संभाव्य अणुबॉम्बचा धोका टाळण्यासाठी हल्ला केल्याचा दावा इस्रायलने केला आहे. पश्चिम आशियातील देशांनी इस्रायलच्या हल्ल्याचा निषेध केला असून, भारतासह जगातील प्रमुख देशांनी तातडीने तणाव निवळण्यासाठी पावले उचलण्याचे आवाहन केले आहे.

दोनशेहून अधिक लढाऊ विमाने

इराणवर केलेल्या हल्ल्यात दोनशेहून अधिक लढाऊ विमानांचा समावेश होता. सुमारे शंभर लक्ष्यांवर हा हल्ला करण्यात आला. सूत्रांनी सांगितले की, इस्रायलची गुप्तहेर संस्था मोसादने स्फोटकांनी युक्त ड्रोन इराणमध्ये या हल्ल्याआधीच पेरून ठेवले होते. हल्ला केल्यानंतर तेहरानजवळील क्षेपणास्त्र प्रक्षेपकांना निकामी करण्यासाठी ही ड्रोन्स सक्रिय करण्यात आली. इस्रायलने अचूक हल्ला करणारी शस्त्रे आणि हल्ला करणारी यंत्रणादेखील मध्य इराणमध्ये तस्करी करून आणली होती. इराणच्या हवाई सुरक्षा यंत्रणांवर हल्ले सुरू झाल्यानंतर अचूक हल्ला करणारी शस्त्रे आणि यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्या.

इराणमधील नतान्झ येथील मुख्य आण्विक सुविधा केंद्रासह इतर प्रमुख लक्ष्ये भेदण्यात आली. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाने त्याला दुजोरा दिला आहे. अनेक रडार केंद्रे, जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांची प्रक्षेपक यंत्रणाही नष्ट करण्यात आल्याचे इस्रायलने म्हटले आहे.

इराणचे तीन प्रमुख सेनाधिकारी ठार

इस्रायलच्या या हल्ल्यात इराणचे वरिष्ठ पातळीवरील तीन सेनाधिकारी ठार झाले. यामध्ये संपूर्ण सेनादलाची जबाबदारी असणारे जनरल महंमद बाघेरी, निमलष्करी गार्डचे प्रमुख जनरल हुसेनी सलामी आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रम चालविणारे जनरल आमिर अली हाजीझादेह यांचा समावेश आहे. यांच्याखेरीज इतर वरिष्ठ सेनाधिकारी आणि शास्त्रज्ञही या हल्ल्यात ठार झाल्याचे खामेनी यांनी म्हटले आहे.

इराणकडून प्रतिहल्ला

इस्रायलच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना इराणने इस्रायलवर १०० ड्रोन डागले. इराक आणि जॉर्डनच्या हवाई हद्दीतून हे ड्रोन्स गेल्याची माहिती त्या देशांनी दिली. हा हल्ला इस्रायलच्या हवाई हद्दीबाहेरच निकामी करण्यात आल्याचे इस्रायलने सांगितले.

अजूनही वेळ गेलेली नाही. इस्रायलचे पुढील नियोजित हल्ले टाळण्यासाठी इराणने अणू कार्यक्रमाबाबत अमेरिकेशी करार करावा. सर्व काही संपुष्टात येण्याआधी असा करार करावा आणि एके काळचे इराणचे साम्राज्य वाचवावे. -डोनाल्ड ट्रम्प, अध्यक्ष, अमेरिका

इस्रायलने आमच्या देशातील नागरी भागांना लक्ष्य करून त्यांचे क्रूर आणि रक्ताने माखलेले हात दाखविले आहेत. यातून त्यांचा दुष्ट हेतू उघड झाला आहे. इस्रायलला धडा शिकवू. आयातुल्ला अली खामेनी, इराणचे सर्वोच्च नेते

इराणवरील हल्ला कमालीचा यशस्वी. आम्ही इराणच्या नतान्झ येथील मुख्य अण्वस्त्रनिर्मिती केंद्राला आणि त्यासाठी काम करणाऱ्या शास्त्रज्ञांना लक्ष्य केले. इराणच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमालाही आम्ही लक्ष्य केले. इराणचे हे कार्यक्रम इस्रायलच्या अस्तित्वालाच धोका होते.बिन्यामिन नेतान्याहू, पंतप्रधान, इस्रायल

इराण व इस्रायलमधील घडामोडींमुळे भारताला चिंता वाटत आहे. परिस्थितीवर भारत बारकाईने लक्ष ठेवून आहे. दोन्ही देशांनी तणाव वाढवू नये, असे आवाहन आम्ही करीत आहोत. इराण व इस्रायलमधील भारतीयांनी सावध राहावे आणि अनावश्यक प्रवास टाळावा. –परराष्ट्र मंत्रालय, भारत

– रशिया, पाकिस्तानकडून इस्रायलच्या हल्ल्याचा निषेध.

– इराण-इस्रायलमधील तणावामुळे खनिज तेलाच्या किमती वाढल्या आणि मोठ्या तेल कंपन्यांचे समभाग गडगडले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शेअरबाजारात घसरण

इराण-इस्रायलदरम्यान वाढलेला तणाव आणि त्यापरिणामी खनिज तेलाचे दर भडकल्याने जगभरातील गुंतवणूकदारांमध्ये चिंतेच्या वातावरणाचे नकारात्मक प्रतिबिंब देशांतर्गत बाजारातही शुक्रवारी उमटले. परिणामी सेन्सेक्स आणि निफ्टी हे प्रमुख निर्देशांक सुमारे १ टक्क्याने घसरले. सलग दुसऱ्या सत्रातील मोठ्या घसरणीने, दोन दिवसांत गुंतवणूकदारांची ८.३५ लाख कोटींची मत्ता लयाला गेली आहे.