एकीकडे रशिया-यु्क्रेन युद्धाच्या परिणामांमधून या दोन्ही देशांसह इतर अनेक देश अद्याप सावरू शकले नसताना पुन्हा एकदा जगाला आणखी एका युद्धाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. इस्रायलनं पॅलेस्टाईनमधील हमास दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर युद्धाची घोषणा केली आहे. त्यामुळे गाझा पट्टी व आसपासच्या भागात या युद्धाचे तीव्र परिणाम दिसण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांपासून इस्रायलच्या भूमीवर हमासच्या दहशतवाद्यांकडून कारवाया केल्या जात असल्याचे दावे केले जात होते. हे दहशतवादी मोठ्या कारवाईच्या तयारीत असल्याचंही बोललं जात होतं. शनिवारी सकाळी इस्रायलच्या भूमीवर गाझा पट्ट्यातून किमान डझनभर रॉकेट लाँच करण्यात आले. त्यापाठोपाठ मोठ्या प्रमाणावर गाझा पट्टीतून हमासच्या दहशतवाद्यांनी घुसखोरी केल्यानंतर इस्रायलनं युद्धाची घोषणा केली.

इस्रायली नागरिकांना घरातच राहण्याचे निर्देश

गाझा पट्ट्यातून मोठ्या प्रमाणावर रॉकेट डागले जाण्याची शक्यता लक्षात घेता इस्रायल सरकारनं आपल्या नागरिकांना घरातच राहण्याचे निर्देश दिले आहेत. “मोठ्या संख्येनं दहशतवादी इस्रायलच्या भूमीत शिरले आहेत. इस्रायलकडूनही या हल्ल्यांना तोडीस तोड प्रत्युत्तर दिलं जात असून गाझा पट्टीत हवाई हल्ले करण्यात येत आहेत”, अशी माहिती इस्रायल लष्कराकडून देण्यात आले आहेत.

एक्सवर(ट्विटर) काही युजर्सने यासंदर्भातले व्हिडीओ पोस्ट केले असून हे इस्रायलवर गाझा पट्टीतून डागण्यात आलेल्या रॉकेट्सचे व्हिडीओ असल्याचं सांगितलं जात आहे.

या रॉकेट हल्ल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गाझा पट्टीत रॉकेट्स, रेड सायरनचे आवाज

एकीकडे इस्रायलमध्ये नागरिकांनी घरात राहण्याचे निर्देश सरकारकडून देण्यात आले असताना गाझा पट्टीत नागरिकांना घरांवरून रॉकेट वेगाने जात असल्याचे, परिसरात सतर्कतेच्या रेड सायरनचे आवाज ऐकू येत आहेत. अगदी तेल अवीवपर्यंत हीच स्थिती असल्याची माहिती एक्सवर (ट्विटर) युजर्स पोस्ट करत आहेत.