वृत्तसंस्था, कैरो
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझामधील युद्ध थांबवण्यासाठी मांडलेल्या २० कलमी प्रस्तावातील काही अटी मान्य करत असल्याचे हमासने शुक्रवारी सांगितले. आपण गाझामधील सत्ता सोडण्यास, तसेच उर्वरित ओलिसांची सुटका करण्यास तयार आहोत असे हमासने जाहीर केले. मात्र, इतर अटींबाबत अन्य पॅलेस्टिनी संघटनांशी सल्लामसलत करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर ‘पॅलेस्टिनियन इस्लामिक जिहाद’ या कट्टर संघटनेने हमासच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे ओलिसांच्या सुटकेची आशा वाढली.

दुसरीकडे, हमासकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझावरील हल्ले तात्काळ थांबवा असे इस्रायलला सांगितले. जागतिक नेत्यांनीही युद्ध तातडीने थांबवण्याचे आवाहन केले. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करत इस्रायलने गाझावरील हल्ल्यांची तीव्रता आणखी वाढवली. गाझा शहर अजूनही धोकादायक असल्याचा दावा इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी केला. दरम्यान, या युद्धात ६७ हजारांपेक्षा जास्त पॅलेस्टिनी ठार झाल्याची माहिती गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने शनिवारी दिली.

२० कलमी शांतता प्रस्तावातील गाझामधील युद्ध थांबवणे, इस्रायलने सैन्य माघारी नेणे आणि इस्रायली ओलीस व पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करणे या अटी हमासने स्वीकारल्या आहेत. हमास आणि पॅलेस्टिनियन इस्लामिक जिहादने घेतलेल्या भूमिकांमुळे ओलिसांची लवकर सुटका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ट्रम्प यांच्या प्रस्तावावर चर्चा कधी सुरू होईल, असा प्रश्न विचारला असता, याबाबत निर्णय झालेला नाही असे हमासच्या नेत्याने सांगितले.

हमासच्या निवेदनाच्या आधारावर मला विश्वास आहे की ते शाश्वत शांततेसाठी तयार आहेत. इस्रायलने गाझावरील बॉम्बहल्ले ताबडतोब थांबवले पाहिजेत, यामुळे आपल्याला ओलीस सुरक्षितपणे आणि तातडीने परत मिळतील! प्रस्तावाच्या अंमलबजावणीसाठी आम्ही चर्चा करतच आहोत. हे केवळ गाझाबद्दल नाही तर संपूर्ण मध्यपूर्वेत शांतता प्रस्थापित होण्याबद्दल आहे. – डोनाल्ड ट्रम्प, अध्यक्ष, अमेरिका