इस्रायल आणि हमासमधील युद्धाचा आज १९ वा दिवस आहे. अजूनही दोन्ही बाजूने एकमेकांवर हल्ले होत आहेत. हमासने २२० हून अधिक सामान्य नागरिकांना ओलीस ठेवलं आहे. या ओलिसांना सोडवण्यासाठी इस्रायली लष्कर प्रयत्न करत आहे. तर, दुसऱ्या बाजूला या ओलिसांच्या बदल्यात हमास इस्रायलबरोबर वाटाघाटी करत आहे. दरम्यान, हमासच्या दहशतवाद्यांनी सोमवारी संध्याकाळी दोन ओलिसांना मुक्त केलं. हमासने दोन वृद्ध इस्रायली महिलांना मुक्त केलं आहे. या दोन्ही महिलांची प्रकृती खालावल्याने हमासने त्यांची सुटका करण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे.

नुरिट कूपर (७९) आणि योचेवेद लिफशिट्ज (८५) अशी या दोन्ही महिलांची नावं आहेत. या दोन्ही महिलांचे पती अद्याप हमासच्या ताब्यात आहेत. अमीरम कूपर (८४) ओडेड लिफशिट्ज (८७) अशी त्यांच्या पतींची नावं आहेत. हमासच्या बेड्यांमधून मुक्त झालेल्या योचेवेद लिफशिट्ज यांच्याशी प्रसारमाध्यमांनी बातचीत केली. यावेळी योचेवेद यांनी हमासच्या ताब्यात असताना त्यांना झालेल्या यातना सांगितल्या. योचेवेद म्हणाल्या गाझात हमासने नरक तयार केलं आहे. त्यांनी ओलीस ठेवलेल्या लोकांचं जगणं नरक बनवलं आहे.

हमासने इस्रायलमधून कसं पळवून नेलं? असा प्रश्न विचारल्यावर योचेवेद म्हणाल्या त्या दिवशी (७ ऑक्टोबर) दहशतवाद्यांनी हल्ला केला. मग ते आमच्या घरांमध्ये घुसले, आधी त्यांनी आम्हाला खूप मारहाण केली. मग मला आणि माझ्या पतीला पकडून नेलं. लहान मुलं, वयोवृद्ध व्यक्ती, असं त्यांनी काहीच पाहिलं नाही. दिसेल त्याला केवळ बेदम मारहाण करत होते. माझे पती ओडेड अजूनही गाझात त्यांच्या ताब्यात आहेत.

योचेवेद म्हणाल्या, त्यांनी आम्हाला मोटरसायकलवर बसवून गाझात नेलं. तिथे हातातलं घड्याळ आणि दागिने काढून घेतले. त्यानंतर आम्हाला काठीने बेदम मारहाण केली. दहशतवाद्यांनी आम्हाला इतकं मारलं की त्या मारहाणीत आमची हाडं मोडली. त्यानंतर आम्हाला एका भुयारात विव्हळत बसवलं. तिथे नीट श्वासही घेता येत नव्हता. अनेक तास आम्हाला भुयारी मार्गाने चालवत कुठेतरी नेलं. तिथे वेगवेगळ्या खोल्यांमध्ये आम्हाला ठेवलं.

हे ही वाचा >> इस्रायलचे गाझा पट्टीवरील हल्ले तीव्र; एकाच दिवसात ७०० पॅलेस्टिनी ठार, हमासचे अनेक दहशतवादी ठार झाल्याचा दावा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

योचेवेद म्हणाल्या, अलिकडच्या काही दिवसांमध्ये हमासचे दहशतवादी आमच्याशी सौम्यपणे वागले आणि आमची योग्य प्रकारे काळजी घेतली. त्यामुळेच येताना मी त्यांचे आभार मानले.