Israel-Iran Conflict : गेल्या काही दिवासांपासून इराण आणि इस्त्रायल यांच्यातील संघर्ष चांगलाच पेटला आहे. यादरम्यान इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू हे सध्या टीकेच्या केंद्रस्थानी सापडले आहेत. मुलाच्या लग्न सोहळ्याला होत असलेला उशीर ही इराणबरोबर सुरू असलेल्या संघर्षाची एक ‘वैयक्तिक किंमत’ असल्याचे विधान नेतन्याहू यांनी केले आहे. दरम्यान त्यांच्या या विधानानंतर त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे.

क्षेपणास्त्र हल्ल्यात नुकसान झालेल्या सोरोका रुग्णालयाच्या बाहेर उभे राहून नेतन्याहू बोलत होते. यावेळी त्यांनी दुसर्‍या महायुद्धातील ब्लिट्झच्या वेळच्या ब्रिटनचा उल्लेख केला. यावेळी त्यांनी सध्या इस्त्रायलमध्ये सुरू असलेला संघर्षाची तुलना दुसर्‍या महायुद्धातील बॉम्ब हल्ल्यांशी केली. “हे मला ब्लिट्झवेळच्या ब्रिटीश लोकांची आठवण करून देते. आपण एका ब्लिट्झमधून जात आहोत,” असे नेतन्याहू म्हणाले. यावेळी त्यांनी त्यांच्या कुटुंबिय आणि सामान्य इस्त्रायली नागरिकांच्या अनुभवांमधील साम्य दाखवण्याचा प्रयत्न केला.

पत्नीचा ‘हिरो’ असा उल्लेख

नेतन्याहू यांनी त्यांच्या कुटुंबाने केलेल्या त्यागाचे उदाहरण देताना त्यांचा मुलगा एव्हनर नेतन्याहू याचे लग्न सुरक्षेच्या कारणामुळे दुसर्‍यांदा पुढे ढकलावे लागल्याचा उल्लेख केला. तसेच हे लग्न पुढे ढकलावे लागल्याने एव्हनरची होणारी पत्नी आणि त्यांची पत्नी सारा नेतन्याहू यांच्यावरही खोलवर परिणाम झाल्याचेही नेतन्याहू यांनी नमूद केले. इतकेच नाही तर त्यांनी ही निराशा सहन केल्याबद्दल पत्नीला ‘हिरो’ देखील म्हटले.

“येथे काही लोक मारले गेले, ज्या कुटुंबांनी प्रियजनांना गमावले, मी याचे खरोखर महत्त्व ओळखतो. आपल्यापैकी प्रत्येक जण वैयक्तिक किंमत मोजत आहे आणि यातून माझं कुटुंब देखील सुटलेलं नाही,” असे नेतन्याहू म्हणाले. एनडीटीव्हीने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.

दरम्यान सोरोका रुग्णालयावर इराणने क्षेपणास्त्र डागल्याच्या पार्श्वभूमीवर नेतन्याहू यांनी केलेल्या या विधानावर ऑनलाईन आणि इस्त्रायली राजकीय वर्तुळातून संताप व्यक्त केला जात आहे. टीकाकारांनी नेतन्याहू यांच्यावर युद्धाच्या वास्तवापासून भावनिकदृष्ट्या वेगळे राहिल्याचा आणि जनतेच्या दु:खापेक्षा स्वत:च्या प्रतिमेला प्राधान्य देत असल्याचा आरोप केला आहे.

इस्त्रायलमध्ये २४ नागरिकांचा मृत्यू

इस्रायलने दिलेल्या माहितीनुसार इराणबरोबर सुरू असलेल्या संघर्षात त्यांच्या २४ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर अमेरिकेतली मानवाधिकार गटाने इराणमध्ये २६३ नागरिकांचा मृत्यू झाल्याचे सांगितले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेतन्याहू हे मुलाच्या लग्नासाठी सुट्टी घेण्याची योजना आखत असल्याचे वृत्त समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला. संघर्ष तसेच सरकारविरोधी आंदोलनांची भीती असताना नेतन्याहू यांच्या मुलाचे लग्न सोमवारी होणार होते. यापूर्वी लग्न हे नोव्हेंबर महिन्यातच नियोजित होते पण सुरक्षेच्या कारणास्तव ते तेव्हा रद्द करण्यात आले होते.