Israel Iran Conflict Updates : इस्त्रायल आणि इराणमधील संघर्ष आणखी चिघळला असून दोन्ही देशांकडून मोठ्या प्रमाणात हवाई हल्ले सुरु आहेत. इस्त्रायलने इराणमधील तेहरान या शहराला टार्गेट केलं आहे. तेहरानमधील विविध महत्वांच्या भागांवर इस्त्रायल हल्ले करत आहे. तसेच इस्त्रायलने इराणच्या सरकारी टीव्ही मुख्यालयासह इराणमधील तेल डेपो लक्ष्य करत त्यावर हल्ले केले आहेत. त्यामुळे या संघर्षात इराणचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच इराण देखील इस्त्रायलवर जोरदार हवाई हल्ले करत असल्याचं पाहायला मिळत आहे.
इराण आणि इस्त्रायलमधील या संघर्षाचा फटका दोन्ही देशांच्या शेजारील राष्ट्रांना बसत आहे. तसेच दोन्ही देशांतील संघर्ष वाढल्यामुळे भारत, अमेरिकेने इराणमधील आपल्या नागरिकांना तेहरान सोडण्याच्या सूचना दिल्या आहेत. एवढंच नाही तर इस्त्रायलने केलेल्या हल्ल्यात इराणच्या प्रमुख लष्करी कमांडरचा देखील खात्मा झाला आहे. त्यामुळे हा इराणसाठी मोठा धक्का मानला जात आहे. यावरून दोन्ही देशांतील संघर्ष आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, इस्त्रायल करत असलेल्या हवाई हल्ल्यानंतर आता इराण अलर्ट झाला असून काही महत्वाची पावलं उचलण्यास इराणने सुरुवात केली आहे.
काही महिन्यांपूर्वी लेबनॉन हादरलं होतं. लेबनॉनमध्ये अचानक पेजर आणि वॉकीटॉकी, रेडिओंचे स्फोट झाले होते. या लेबनॉनमध्ये पेजर आणि वॉकी-टॉकी हल्ल्यात अनेक लोकांचा मृत्यू झाला होता. लेबनॉन पेजर आणि वॉकी-टॉकी हल्ल्याच्या घटनेतून आता इराणने धडा घेत इस्त्रायल अशा हल्ल्याचा देखील प्रयत्न करू शकतो, त्या पार्श्वभूमीवर इंटरनेटशी कनेक्टेड सर्व उपकरणांवर इराणने बंदी घातल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, इस्रायलबरोबर वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणच्या सायबर सुरक्षा कमांडने सरकारी अधिकारी आणि त्यांच्या सुरक्षा पथकांसाठी इंटरनेट कनेक्टेड डिव्हाइसेस वापरण्यास बंदी घातली आहे. तसेच अधिकाऱ्यांना अँटी ट्रॅकिंग डिव्हाईस वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. इस्रायली एजन्सी अधिकाऱ्यांचा खात्मा करण्यासाठी मोबाइल नेटवर्कचा वापर करू शकतील या भीतीच्या पार्श्वभूमीवर हे निर्देश देण्यात आलं असल्याचं वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे. अधिकारी आणि त्यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना कनेक्टेड डिव्हाइसेसचा वापर करण्यास तात्पुरती बंदी घालण्यात आल्याचं वृत्तात म्हटलं आहे.