नवी दिल्ली : इराण-इस्रायल युद्धाची व्याप्ती वाढल्याने इराक, जॉर्डन, लेबनॉन, सीरिया आणि येमेनसह पश्चिम आशियाई देशांबरोबरच्या भारताच्या व्यापारावर व्यापक परिणाम होतील, असे मत अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. या युद्धामुळे इराण आणि इस्रायलला होणाऱ्या भारताच्या निर्यातीवर आधीच परिणाम होऊ लागला आहे, असेही त्यांनी सांगितले.

‘‘या युद्धामुळे आपण आता मोठ्या संकटात सापडलो आहोत. त्याचा पश्चिम आशियाई देशांबरोबरच्या भारताच्या व्यापारावर मोठा परिणाम होईल,’’ असे मुंबईस्थित निर्यातदार आणि ‘टेक्नोक्राफ्ट इंडस्ट्रीज इंडिया’चे संस्थापक अध्यक्ष शरद कुमार सराफ यांनी सांगितले. सराफ यांची कंपनी नायलॉन व प्लास्टिक प्लग, कॅप्सिल क्लोजर आणि क्लॅम्प्स यांचे उत्पादन करते.

आणखी एका निर्यातदाराने सांगितले की, इस्रायल-हमास संघर्ष व लाल समुद्रात व्यापारी जहाजांवर येमेन समर्थित हुथींच्या हल्ल्याच्या परिणामांमुळे व्यापारी अडचणीत आहेत. त्यामुळे भारताची मालवाहतूक आफ्रिका खंडाला वळसा घालून केप ऑफ गुड होप येथून केली जात आहे. मात्र इराण-इस्रायल युद्धामुळे होर्मुझची खाडी प्रभावित होत आहे. या मार्गाचा परिणाम तेल टँकरच्या वाहतुकीवर होणार आहे. जर नवा मार्ग शोधला तर कच्च्या तेलाच्या किमती वाढतील असे त्यांनी सांगितले.

रशिया, अमेरिकेकडून तेल आयातीत वाढ

नवी दिल्ली : इस्रायलने इराणवर केलेल्या नाट्यमय हल्ल्यामुळे बाजारपेठेत अस्थिरता निर्माण झाली असताना, भारताने जूनमध्ये रशियन तेलाची खरेदी वाढवली आहे, सौदी अरेबिया आणि इराकसारख्या मध्य पूर्वेतील पुरवठादारांकडून एकत्रित प्रमाणापेक्षा जास्त आयात केली आहे. इराण- इस्रायल लष्करी संघर्ष वाढण्याच्या शक्यतेने भारताने हे पाऊल उचलले आहे. भारतीय तेलशुद्धीकरण प्रकल्प जूनमध्ये दररोज २ ते २.२ दशलक्ष बॅरल रशियन कच्चे तेल आयात करण्याची शक्यता आहे. गेल्या दोन वर्षांतील सर्वाधिक आणि इराक, सौदी अरेबिया, यूएई आणि कुवेतमधून खरेदी केलेल्या एकूण प्रमाणापेक्षा जास्त आहे, असे जागतिक व्यापार विश्लेषण कंपनी केप्लरने केलेल्या प्राथमिक आकडेवारीवरून दिसून आले आहे.