इस्रायल आणि पॅलेस्टाइनमधील संघर्ष वाढला असून इस्रायलने आता थेट युद्धाची घोषणा केली आहे. शनिवारी सकाळपासून सुरू झालेला हा संघर्ष अद्यापही थांबलेला नाही. दरम्यान, या संघर्षादरम्यान, मृतांचा आकडाही वाढला आहे. कालपर्यंत (शनिवार) ३०० जणांचा मृत्यू झाला होता. तर, आता हाच आकडा ४८० वर पोहोचला आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

गाझा पट्टीतील सत्ताधारी ‘हमास’ या दहशतवादी गटाने शनिवारी पहाटे इस्रायलवर केलेल्या अभूतपूर्व हल्ल्यात १०० जण ठार झाले होते. तर इस्रायलने प्रत्युत्तरादाखल गाझा पट्टीवर केलेल्या हल्ल्यात १९८ नागरिक ठार झाल्याचा दावा पॅलेस्टिनने केला होता. तर, आता इस्रायलनेही युद्धाची घोषणा केल्याने तिथे संघर्ष वाढला आहे. परिणामी मृतांचा आकडाही वाढला आहे. इस्रायल आणि पॅलेस्टाइन युद्धात आतापर्यंत ४८० जणांचा मृत्यू झाला असून अनेक इस्रायलींना कैद केले असल्याचा दावाही हमासकडून करण्यात आला आहे.

हेही वाचा >> ‘हमास’विरोधात इस्रायलने आखली रणनीती; पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू म्हणाले, “युद्धसक्ती लादल्याने…”

कारवाई सुरू

इस्रायली सैन्याने रविवारी सांगितले की, इस्रायलमध्ये ज्या ठिकाणाहू गोळीबार झाला होता त्या लेबनॉनमधील भागात प्रत्युत्तरादाखल कारवाई करण्यात येत आहे. तर, इस्रायली लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले की, गाझा पट्टीच्या आजूबाजूच्या आठ भागात अजूनही कारवाई सुरू आहे.

हमासकडूनही आवाहन

‘हमास’च्या लष्करी म्होरक्याने सर्व पॅलेस्टिनींना इस्रायलशी लढण्यास सज्ज राहण्याचे आवाहन केले. आम्ही पुरेसा संघर्ष करण्याचा निर्धार केला आहे, असे तो म्हणाला. ‘हमास’च्या हल्ल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामीन नेतान्याहू यांनी नागरिकांना उद्देशून केलेल्या भाषणात युद्धाला तोंड फुटल्याची घोषणा केली. नेतान्याहू यांनी दूरचित्रवाहिनीवरील आपल्या संबोधनात देशवासीयांना देश युद्धात उतरल्याचे सांगितले. ‘हमास’ने कधी कल्पनाही केली नसेल एवढी किंमत त्यांना चुकवावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. ते म्हणाले आपण युद्धात असून, ही निव्वळ लष्करी मोहीम नसून, युद्धाला सुरुवात झाली आहे.

अमेरिकेचा इस्रायलला पाठिंबा

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनीही हमासकडून इस्रायलवर झालेल्या हल्ल्यावर प्रतिक्रिया दिली. तसेच इस्रायलला सर्वोतपरी मदतीची घोषणा केली. जो बायडेन म्हणाले, “मी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना स्पष्टपणे सांगितलं आहे की, अमेरिका इस्रायलच्या सरकारला आणि तेथील लोकांना सर्व प्रकारची मदत देण्यासाठी तयार आहे. हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायलला बचावाचा आणि इस्रायलच्या जनतेची सुरक्षा करण्याचा पूर्ण अधिकार आहे.” बायडेन यांनी दिलेल्या अमेरिकेच्या मदतीबद्दल बेंजामिन नेतान्याहू यांनीही आभार व्यक्त केले आहे. याबाबत त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत याबाबत माहिती दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इस्रायलकडून इशारा

शनिवारी झालेला हल्ला इस्रायलसाठी काळा दिवस ठरला आहे. परंतु, हमासकडून झालेल्या या हल्ल्याविरोधात इस्रायल चोख प्रत्युत्तर देईल, असा इशारा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहून यांनी दिला आहे. हमासच्या सर्व क्षमता नष्ट करण्याकरता इस्रायल डिफेन्स फोर्सचा पुरेपूर वापर करण्यात येणार आहे, अशीही माहिती नेतन्याहू यांनी दिली.