Israel plan to kill Khamenei : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलच्या एका योजनेबाबत व्हेटो (Vetoe – नकाराधिकार) वापरला आहे. या योजनेअंतर्गत इस्रायलने इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खोमेनी यांच्या हत्येचा कट रचला होता. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. एका अमेरिकन अधिकाऱ्याचा हवाला देत वृत्तसंस्थेने म्हटलं आहे की “आतापर्यंत इराणने, इराणी लोकांनी कधी कुठल्या अमेरिकन व्यक्तीला मारलंय का? नाही. असं कधीच झालेलं नाही. असं होत नाही तोवर आम्ही इराणच्या राजकीय नेतृत्वावर हल्ला करण्याचा विचारही करणार नाही”.
दरम्यान, या वृत्तांबाबत इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांच्याकडे विचारणा केल्यानंतर त्यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. ते म्हणाले, “मला यावर काहीच बोलायचं नाही”. मात्र, फॉक्स न्यूजला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी इराणमध्ये सत्तापरिवर्तन शक्य असल्याचं वक्तव्य केलं आहे. नेतान्याहू यांनी यावेळी स्पष्ट केलं की “इराणवरील हल्ल्याच्या आधी आम्ही अमेरिकेला त्याबाबत कल्पना दिली होती”.
डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
दुसऱ्या बाजूला ट्रम्प यांनी इराणला इशारा दिला आहे. त्याचबरोबर त्यांनी मुत्सद्देगिरीसाठी राजकीय चर्चेसाठीचे दरवाजे खुले ठेवले आहेत. त्यांनी ट्रुथ या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की “आमच्यावर कुठल्याही प्रकारचा हल्ला झाल्यास आमचं लष्कर पूर्ण ताकदीनिशी इराणवर तुटून पडेल. याआधी कधीच कोणी पाहीलं नसेल इतक्या त्वेषाने आम्ही त्यांच्यावर चाल करू”. एका बाजूला निर्वाणीचं वक्तव्य करत ट्रम्प यांनी इराण व इस्रायलमध्ये शांतता करार होण्याची शक्यता देखील वर्तवली आहे. “आम्ही सहजपणे एका मतावर एकत्र येऊ शकतो आणि शांतता करार करू शकतो. जेणेकरून हा रक्तपात व संघर्ष थांबेल”, असंही ट्रम्प म्हणाले.
डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायल-इराणला शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. ते म्हणाले, “दोन कट्टर शत्रूंमध्ये सामंजस्य करार होऊ शकतो अशी मला आशा वाटतेय. मी अलीकडेच भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम घडवून आणला आहे. माझ्या अध्यक्षपदाच्या पहिल्या कार्यकाळात मी सर्बिया व कोसोव्होमधील भांडण सोडवलं होतं. मला वाटतंय की इस्रायल व इराणमध्ये देखील लवकरच शांतता करार होईल. सध्या यावर अनेक फोनकॉल्स व बैठका होत आहेत.
व्हेटो म्हणजे काय?
व्हेटो म्हणजे कोणत्याही निर्णयावर किंवा प्रस्तावावर प्रतिबंध घालण्याचा अधिकार. एखादी व्यक्ती, संस्था किंवा देशाला दिलेला असा अधिकार की ज्याचा वापर केल्याने एखादा निर्णय रोखता येतो. इतर सर्वजण त्या निर्णयाशी सहमत असले तरी तो निर्णय अडवता येतो.